Monday 10 February 2014

व्यंगचित्रकार संमेलनाला राजाश्रय मिळवून देऊ - डी.पी.सावंत


मराठी व्यंगचित्रकार अल्पसंख्य असले तरी त्यांच्या संमेलनाला यापुढे राजाश्रय निश्‍चित मिळवून देऊ, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री व पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी दिली.
लातूर येथील कुसुम सभागृहात १६ वे अ.भा.मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे उद््घाटन पालकमंत्री सावंत यांच्याहस्ते झाले. त्यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, व्यंगचित्रकलेची ताकद फार मोठी आहे, या संमेलनाच्या लोगोतील चित्रात रबरी ठोसा आहे, असे सांगण्यात आले. परंतु त्याचा ठोसा रबरी असला तरी त्याची जखम फार काळ दुखत राहते, असे नमूद करीत पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी व्यंगचित्रकलेचा प्रचार व प्रसार आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या संमेलनाला यापुढे राजाश्रय (आर्थिक मदत) मिळवून देण्याची ग्वाही देत ते म्हणाले की, व्यंगचित्रकला ही कौशल्य विकासाचाच भाग आहे. ही कला शिकवली जाऊ शकत नाही, ती उपजतच असावी लागते. बाळ ठाकरे यांचे या ंक्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. त्यांनी मार्मिकच्या माध्यमातून आपल्यातील प्रतिभेचे सर्मथ दर्शन घडविले. केवळ मुंबई,पुण्यापुरतीच ही कला र्मयादित राहता कामा नये, त्साठी नव्या पिढीला व्यंगचित्रकलेविषयी गोडी लागावी यासाठी विविध जिल्हा ठिकाणी अशी संमेलने झाली पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
राजकारणीच सॉफ्ट टार्गेट
बहुतांश वेळा राजकारणी हेच व्यंगचित्रकारांचे सॉफ्ट टार्गेट असतात. त्याचा काही राजकारण्यांना रागही येतो,आम्ही त्यातले नाही. परंतु आम्हीही माणसेच आहोत, आमच्या वाईट बाजूंवर टीका करताना चांगल्या बाजूंवरही प्रकाश टाकावा, असे कळकळीचे आवाहन डी. पी. सावंत यांनी केले