Thursday 1 October 2015

मंत्रालयातील पाकीटबहाद्दर पत्रकारांची हुकुमशाही

विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आपल्या पत्रकारांना मंत्रालयात वृत्तसंकलन करण्यासाठी नेमणूक करत असतात. मंत्रालयाचे वृत्तसंकलन करताना पत्रकारांना आपल्या वाहिनी किंवा वृत्तपत्रासाठी जशी बातमी हवी तशी मिळवण्याचा किंवा प्रश्न विचारून तशी बातमी मिळवण्याचा हक्क आहे. परंतू असा हक्क मंत्रालयात वर्षानुवर्षे आपली दुकाने थाटून बसलेल्या पत्रकारांनी हिरावून घेण्यास सुरुवात केली आहे. दुकानदारी करणाऱ्या हुकुमशाही पत्रकारांमुळे संतापाची लाट पसरली आहे. 

महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालवला जातो अश्या मंत्रालयामध्ये मोठ्या संखेने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचे पत्रकार वृत्तसंकलन करत असतात. केंद्र सरकारच्या आरएनआय कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क विभागाकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांचे संपादक आपल्या कार्यालयातील चांगल्या पत्रकाराला याठिकाणी वृत्तसंकलन करण्यासाठी पाठवत असतात. या बिट वर पाठवलेल्या पत्रकाराने चांगल्या बातम्या आणाव्यात अशी अपेक्षा संपादकांची असते. 

परंतू मंत्रालय बिटवर गेले कित्तेक वर्षे फेविकोल लावून बसलेल्या पत्रकारांना असे नवीन पत्रकार आलेले नको असतात. या बिटवर चिकटलेल्या अनेक पत्रकारांची मंत्री आणि अधिकारी यांच्या बरोबर असलेली आर्थिक मैत्री तुटेल आणि या मध्ये नवीन पत्रकार वाटेकरी होतील अशी भीती या जुन्या पत्रकारांना असते. यामुळे जुन्या पत्रकारांव्यतिरिक्त कोणी प्रश्न विचारल्यास मंत्र्यांचे आर्थिक मित्र असलेल्या पत्रकारांना प्रचंड राग येत असतो. वेळ प्रसंगी अश्या पत्रकाराला शिव्या आणि बरे वाईट बोलण्यात येते. 

यामुळे गेले कित्तेक वर्षे मंत्रालयात फेव्हीकोल लावून चिकटून बसलेल्या पत्रकारांची हुकुमशाही सुरु आहे. हि हुकुमशाही इतर पत्रकारांना नकोशी झाली आहे. या हुकुमशाहीमुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आपण मंत्रालयात मोजक्या पत्रकारांची संघटना चालवणारे, डीजीपीआरचे संचालक, अधिकारी आणि मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, मंत्र्याची पाकिटे घेणारे पत्रकार असल्याने कोणीही आमचे वाकडे करू शकत नाही असा समज या जुन्या पत्रकारांना झाला आहे. 

या अशा पत्रकारांना त्यांचे संपादक मंत्रालयात हुकुमशाही आणि दादागिरी करायला पाठवतात का ? इतरांवर दादागिरी करून प्रश्न विचारण्यापासून रोखून संबंधित मंत्र्यांना खुश करण्यासाठी या पत्रकारांना पाठवले जाते का ? मंत्र्यांना खुश करून पाकिटे गोळा करणे हा यांचा उद्देश असला तरी यांचा हा उद्देश त्यांच्या संपादकांना माहित नाही का ? माहीत असल्यास अश्या पत्रकारांचे संपादक यांची उचलबांगडी का करत नाहीत ? संपादकानाही या पाकिटातील हिस्सा जातो का असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.