Wednesday 14 October 2015

मटक्‍याचे आकडे छापणाऱ्या दैनिक "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘वर गुन्हा दाखल

गोव्यात मटक्‍याचा धंदा जोरात सुरु आहे. मटक्याचा धंदा चालवणारे आपला धंदा आणखी जोरात चालवा म्हणून वृत्तपत्रातून जाहिराती देत असतात. अश्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या दैनिक "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवर गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाई मुळे बेकायादेशीर कामे करणाऱ्यांना वृत्तपत्रांचीही साथ असल्याचे उघड झाले आहे. वृत्तपत्रांसह काही मटका ऑपरेटर तसेच एक अनोळखी मंत्री, काही राजकारणी, पोलिस अधिकाऱ्यांवरही उच्च न्यायलयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु झाला असून संबंधित वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांकडेही चौकशी होईल असे या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वेश कर्पे यांनी सांगितले.  

गोव्यातील आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये, डॉ. केतन गोवेकर, संजय सरमळकर, रुई फेरेरा, सोनिया सातर्डेकर, डेस्मंड अल्वारेस यांनी गोव्यातील मटका जुगाराविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडे धाव घेतली. या जनहित याचिकेत गेल्या दहा वर्षातील मटका जुगार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली होती. गोव्यात राजरोस चालणाऱ्या मटक्‍यावर पोलिस कारवाई करत नाहीत, उलट राजकीय पाठबळ आणि हप्तेखोरीमुळे जुगाराला बळच मिळते वृत्तपत्रातून मटक्‍याचे आकडे प्रसिध्द होत असल्याने त्याचा वेगाने प्रसार होतो तसेच यात तरुण पिढीही ओढली जाते याकडे काशिनाथ शेट्ये व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेत लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी मटक्‍याचा व्यवहार कसा चालतो तसेच "पुढारी‘ व "तरुण भारत‘मधून आकडे कसे प्रसिध्द होतात याचीही माहिती दिली होती.

खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर याचिकेतील माहितीवर आधारीत गुन्हा दाखल करण्याचे तसेच त्यावर पुढील तपास करण्याचे आदेश दिले. दर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा प्रगती अहवाल न्यायालयास सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा शाखेच्या रायबंदर-पणजी कार्यालयात गुन्हा नोंद झाला आहे. भादंवि कलम 109, 120 (बी), (34), गोवा-दमण- दीव जुगारप्रतिबंधक कायदा 1976 च्या कलम 3, 4,11 (2) 12 (1) (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात गोव्यातील राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. तर "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवरही गुन्हा नोंद झाल्याने आकडे प्रसिध्द करण्याचे प्रकार चर्चेत आला आहे. यावर पोलिस पुढे काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.

गोव्यात दाखल झालेल्या गुन्ह्याने मटका चालवणारे, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसोबतच मटक्‍याचे आकडे प्रसिध्द करणाऱ्या वृत्तपत्रांना चपराक बसली आहे. या दोन्ही वृत्तपत्रांनी मटक्‍याचे आकडे प्रसिध्द केल्याचा गुन्हा गोवा दमण दीव जुगार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार नोंद झाला आहे. "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘सह 1100 मटका बुकींच्या विरोधात पणजी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. गुन्हा अन्वेषण शाखेने या दोन वृत्तपत्रांसह यात गुंतलेल्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मटका जुगार चालवणाऱ्या काहींची नावेही यात समाविष्ट आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वास कर्पे यांनी "पुढारी‘ व "तरुण भारत‘मध्ये छापलेल्या आकड्यांची माहिती घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांस काही दिवसात बोलावण्यात येईल असे आज येथे सांगितले. या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणीही केली जाईल असे सांगितले. 

महाराष्ट्र पोलिस कारवाई करणार काय? 
बेटिंग ही समजाला लागलेली कीड आहे. गरीबांचे घरदार उध्वस्त करणाऱ्या या बेकायदा धंद्याच्या विरोधात निर्णायक कारवाई होत नाही याला कंटाळूनच गोव्यातील माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीसांना "पुढारी‘, "तरुण भारत‘सह अनेकांवर गुन्हे दाखल करणे भाग पडले आहे. मटका जुगार गोव्यात आहे तसाच महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकातही राजरोस सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तरी गोव्यातील पोलिसांनी मटक्‍यावर हातोडा उगारला आहे. यातून महाराष्ट्राचे पोलिस काही शिकणार का? असा सवाल विचारला जात आहे. मटका आणि त्याचे आकडे प्रसिध्द करणे हा महाराष्ट्रातही सर्रास चालणारा प्रकार आहे. त्यावर पोलिसी बडगा उगारला जाणार का याकडे लक्ष असेल.