Saturday 25 July 2015

पत्रकार संरक्षण कायदा प्रारुप महिन्यात तयार करणार - गृहराज्यमंत्री राम शिंदे


मुंबई, दि. २४ :- राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले तसेच त्यांच्या हत्या रोखण्यसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिषद सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला मोठे यश मिळाले असून पत्रकार संरक्षण आणि हल्लाविरोधी कायद्याचे प्रारुप एक महिन्यात तयार करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सभागृहात दिले. यामुळे पत्रकार संरक्षणविषयक कायदा निर्मितीची प्रक्रिया एका निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे.


विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, राज्यात गेल्या तीन वर्षात २६५ पत्रकारांवर हल्ले झाले असून त्यातकाही पत्रकारांना प्राणही गमवावे लागले आहेत. मीरा रोड परिसरात राघवेंद्र दुबे या पत्रकाराची झालेली हत्या तसेच वार्तांकनासाठी गेलेल्या महिला पत्रकाराचा मुंबईत झालेला विनयभंग या गंभीर घटना आहेत. अशा घटनांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण असून पत्रकारांच्या सर्वच संघटना या कायद्याची मागणी करीत रस्त्यावर उतरल्या आहेत. पत्रकार संघटनांनी लोकप्रतिनिधींना हजारो एसएमएस पाठवून केलेल्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. राज्यातील पत्रकारांमधील असुरक्षितेतेची दखल घेऊन पत्रकार संरक्षण कायदा राज्यात तातडीने लागू करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. आपण कायदा करणार की संरक्षण परिषद स्थापन करणार याबाबतचा खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली.

या लक्षवेधीला उत्तर देतांना गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मुख्यमंत्री, विधीमंडळाचे नेते, विरोधी पक्षनते तसेच सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन एका महिन्यात पत्रकार संरक्षणकायद्याचे प्रारुप तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर चर्चा करताना  मुंडे यांनी, कायद्याचे प्रारुप निश्चित झाल्यावर त्यासंबंधीचा  अध्यादेश तातडीने जारी करण्यातयावा तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणीकेली. विधान परिषद सदस्य माणिकराव ठाकरे, किरण पावसकर, विद्या चव्हाण, डॉ.नीलम गोऱ्हे, हेमंत टकले, संजय दत्त आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.