Wednesday 2 April 2014

खंडणीची मागणी करणार्‍या पत्रकाराला नवी मुंबईत अटक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे वर्तमानपत्रात छापून बदनामी करण्याची धमकी देत उपायुक्त सुधीर चेके यांच्याकडे १४ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या पत्रकाराला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. दिनकर सोनकांबळे असे या खंडणीखोर पत्रकाराचे नाव असून तो 'विश्‍वपथ' या साप्ताहिकाचा संपादक आहे. 
या प्रकरणात अटक करण्यात आलेला खंडणीखोर विश्‍वपथ साप्ताहिकाचा संपादक दिनकर सोन कांबळे हा गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागाचे उपायुक्त सुधीर चेके, अधिकारी दत्तात्रेय नागरे यांना त्यांच्या विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून बदनामी करण्याची धमकी देत होता. तसेच ही बातमी न छापण्यासाठी त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होता. उपायुक्त चेके यांनी सुरुवातीला सोनकांबळे याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतरदेखील सोनकांबळे हा वारंवार त्यांना धमकावत होता. मंगळवारीदेखील सोनकांबळे कोपरखैरणे येथील एलबीटीच्या कार्यालयात गेला होता. या वेळी त्याने सुधीर चेके यांना धमकावून त्यांच्याकडे १४ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे चेके यांनी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला याबाबतची माहिती दिली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने दिनकर सोनकांबळे याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, धमकावणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.