Saturday 29 March 2014

पत्रकारांच्या अस्मितेला जेव्हा जाग येते….

sampat
मुंबई पेड न्यूजची राजधानीय असं बिनधास्त आणि एखादया राजकीय पक्षाच्या नेत्याला शोभावं असं विधान निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी काल मुंबईत केल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर पत्रकारांची अस्मिता जागी झाली अन त्यांनी ब्रम्हा यांच्या टिप्पणीला जोरदार आक्षेप घेतला.आपली चूक लक्षात येताच ब्रम्हा यांनी दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकला.शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत हे नाट्य घडले.
अलिकडे अनेकजण पत्रकारांवर विविध स्वरूपाचे आरोप करीत असतात.अरविंद केजरीवाल यांनी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी वारंवार माध्यमांवर टीकेची झोड उठविल्यानंतरही माध्यमाकडून त्याला जेवढ्या तीव्रपणे प्रतिकार व्हायला हवा तेवढा होताना दिसत नाही.पत्रकारांबद्दल काहीही बोलले तरी निषेधाचं एखादं पत्रक काढण्याचं धैर्यही मान्यवर पत्रकार किंवा पत्रकार संघटना दाखवत नाहीत. आरोप झाल्यानंतर पत्रकारांची दातखीळ बसते आहे म्हणजे पत्रकारांचेच कुठे तरी चुकते आहे,केले जाणारे आरोपही सत्य आहेत अशी पत्रकारांची जनमानसात प्रतिमा तयार होताना दिसते आहे. .ती एकूणच पत्रकारितेला मारक आहे.अशा स्थितीत ब्रम्हा यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या मुंबईतील पत्रकारांनी आपल्या संपत चाललेल्या अस्मितेचे दर्शन घडवत ब्रम्हा यांच्या आरोपाल जोरदार आक्षेप घेतला.त्यामुळं त्यांना माफी मागावी लागली.मुख्य निवडणूक आयुक्त व्हा.एस.संपत यांनाही मध्यस्थी करीत विषय संपवावा लागला.आपली अस्मिता दाखवून देणाऱ्या पत्रकारांचे आभार.ेमुंबईतील पत्रकारांचे हे धाडस पाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या पत्रकारांना नक्कीच दिलासा मिळाला असेल. पत्रकारांवर हल्ले होतात,महिला पत्रकारावर बलात्कार होतात,नेत्यांकडून वारंवार हल्ले होतात तेव्हाही अशीच अस्मिता जागी ठेवली तर अशा घटना होणार नाहीत असे आता पत्रकार बोलायला लागले आहेत.