Sunday 6 April 2014

शेवाळेंची पत्रकारांना "प्रीतम" पार्टी

मुंबई महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शनिवारी ५ एप्रिल २०१४ रोजी दादरच्या प्रीतम हॉटेल मध्ये एक पार्टी दिली आहे. शेवाळे यांनी हि पार्टी गेले काही दिवस आपल्या निवडणुकीच्या बातम्या न चुकता पैसे घेवून लावणाऱ्या मोठ्या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणवणाऱ्या पत्रकारांनाच दिली असल्याची माहिती या पार्टी मध्ये सहभागी झालेल्या पत्रकाराने बेरक्याला दिली आहे.


मुंबई महानगर पालिकेमध्ये गेले ४ वर्षे राहुल शेवाळे स्थायी समिती अध्यक्ष होते. या काळात शेवाळे यांनी प्रत्येक टेंडर मध्ये टक्केवारी काढण्याचे काम केले. टक्केवारी काढत असताना पत्रकार आपल्या विरोधात बातमी प्रसिद्ध करू नये यासाठी पत्रकारांना खुश ठेवण्यासाठी पाकिटाची सवय लावली. आपली टक्केवारी मिळवण्यात अडचण येवू नये तसेच पत्रकारांना पाकीट वेळेवर देता यावीत यासाठी एका निवृत्त कर्मचाऱ्याची नेमणूक सुद्धा शेवाळे यांनी केली. दर महिन्याला मिळणाऱ्या पाकीटामुळे पत्रकारांनी शेवाळे यांची हुजरेगिरी सुरु केली.

शेवाळेंच्या बातम्या कश्या जास्तीत जास्त पेपर मध्ये कशा छापून येतील यासाठी पालिकेतील दोन पत्रकार पुढाकार घेत होते. यामुळे शेवाळे यांनी काही मोजक्या पाकीट बहाद्दर पत्रकारांनाच आपल्या बातम्या देण्यास सुरुवात केली होती. गेल्या चार वर्षामध्ये पालिकेमधील कोणत्याही पत्रकाराने शेवाळे यांच्या विरोधात बातमी छापण्याची हिम्मत दाखवली नाही. एकीकडे कार्यालयातून मिळणारा पगार आणि दुसरीकडे शेवाळे यांच्या कडून मिळणारे पाकीट यामुळे पत्रकारांनी गेल्या चार वर्षामध्ये चांगलीच मजा करून घेतली.

सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देवून शिवसेनेने शेवाळे यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून बाजूला केले आहे. अशा वेळी शेवाळे यांची हुजरेगिरी करणारे पत्रकार मात्र आजही आपल्या वर्तमान पत्रामधून त्यांच्या गोडवे गाणाऱ्या बातम्या प्रसिध्द करून पाकिटे मिळवत आहेत. निवडणूक आयोगाने पेड न्यूज वर बंदी घातली असताना शेवाळे यांच्या बातम्या आयोगाच्या निदर्शनास कश्या येत नाहीत, ज्या वृत्तपत्रातून गेले चार वर्षे पाकिटे घेवून शेवाळेंच्या बातम्या प्रसिध्द केल्या जात होत्या त्या मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांवर संपादकांना संशय कसा आला नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत.