Monday 5 May 2014

'भांडवलदारीमुळे पत्रकारांची ससेहोलपट'

पत्रकारितेत विचारस्वातंत्र्यापेक्षा अर्थकारणाचा भाग मोठा बनला आहे. राजकीय पुढारी आणि उद्योजक आजच्या वृत्तपत्रांचे मालक बनले आहेत. पत्रकारिता आता भांडवलदारी उद्योग झाला आहे; त्यामुळे पत्रकारांची ससेहोलपट होत आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागूल यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय; मुलुंड विभाग, ग. क. खांडेकर आणि न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेत "संपादकाच्या खुर्चीतून' या विषयावर ते बोलत होते. 

बागूल म्हणाले की, भांडवलदारी प्रवृत्तीमुळे निःस्पृहपणे पत्रकारिता करणे पत्रकार आणि संपादक यांच्यासाठी अवघड बनले आहे. बहुश्रुतता, संपर्क आणि वाचन हे संपादकासाठी आवश्‍यक आहे. त्याला सतत नव्या गोष्टीचे कुतूहल असले पाहिजे. तो निर्भय असला पाहिजे. नेमका हा गुण अलीकडे दुर्मिळ होत चालला आहे. पत्रकारितेच्या नोकरीत मालकांच्या विचाराने काम करावे लागते. पेड न्यूज हादेखील त्यातलाच प्रकार आहे. 

भ्रष्टाचारामुळे देश पोखरून निघाला आहे. पत्रकारांचे बोटचेपे धोरणही त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. मालकांच्या धोरणामुळे त्यांचाही नाइलाज होत आहे, असेही बागूल म्हणाले. पत्रकारितेचे क्षेत्र आनंददायी आहे. प्रतिष्ठेचे आहे. तुम्ही जे अभ्यासता, लिहिता ते अनेकांच्या नजरेत येते. येथे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जातात, असेही त्यांनी सांगितले. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर हल्ली चर्चाच होत नाही. संपादकांनी हिंमत दाखविल्यास अनेक समस्यांची तड लागू शकेल. आजही अनेक नेते, गुंड पत्रकारांना घाबरतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.