Saturday 14 June 2014

पेड न्यूज प्रकार गैरच - केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

मुंबई : गेल्या काही निवडणुकांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर पेड न्यूजचे प्रकार घडले आहेत.पेड न्यूज राजकीय असो किंवा गैर राजकीय. हा प्रकारच गैर असून तो नाकारणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी आहे. या कारणास्तव प्रसारमाध्यमांनी जागरुक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. दूरदर्शन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते.
आधुनिकतेचे वारे वाहण्याअगोदर सरकारी माध्यम असल्याने आकाशवाणी व दूरदर्शन यांची प्रसारमाध्यमांवर मक्तेदारी होती;परंतु खाजगी वाहिन्यांचा विकास आणि प्रसारामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे सरकारी माध्यमांसमोर आव्हान असणार आहे. सरकारी माध्यमांनी आता पहिल्या क्रमांकावर असे राहू, याबाबत विचार केला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जनतेशी संबंधित विषयावर आधारित कार्यक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे जावडेकर म्हणाले. आगामी काळात एफएम चॅनेलवर बातम्या प्रसारित करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, मात्र माहितीचा स्रोत उत्तम आणि अधिकृत हवा, असे ते म्हणाले.