Friday 22 August 2014

अमेरिकन पत्रकाराच्या हत्येचा राष्ट्रसंघाकडून निषेध

संयुक्त राष्ट्रसंघ - इराकमध्ये एका अमेरिकन पत्रकाराची दहशतवाद्यांनी हत्या केल्याच्या घटनेचा संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. अमेरिकेचे मुक्त पत्रकार असलेल्या जेम्स फॉली यांची इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक (आयसिस) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी गळा चिरुन हत्या केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

हा एक अत्यंत घृणास्पद अपराध‘ असल्याची निर्भत्सना मून यांनी केली आहे. ""फॉली यांच्या हत्येचा मून यांनी अत्यंत कठोर शब्दांत निषेध केला आहे. अशा प्रकारचे घृणास्पद अपराध करणाऱ्या अपराध्यांविरोधात कठोर कारवाई व्हावयास हवी,‘‘ असे निवेदन मून यांच्या प्रवक्‍त्याने प्रसिद्ध केले. फॉली यांना मून यांनी श्रद्धांजलीही समर्पित केली आहे. आयसिसच्या या व्हिडिओमुळे जगामध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडिओसह अमेरिकेने दहशतवाद्यांना लक्ष्य केल्यास त्यांना रक्तात न्हाऊ घालू, असा इशाराही आयसिसने दिला आहे.