Tuesday 14 October 2014

राज ठाकरे पत्रकारांवर भडकले

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाद्वारे आयोजित एक वार्तालाप कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोमवारी आमंत्रित करण्यात आले होते. या वार्तालाप कार्यक्रमात राज ठाकरे यांना आपल्या सोयीचे असे प्रश्न विचारले जातील अशी अपेक्षा होती. परंतू पत्रकारांनी अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारले गेल्याने राज ठाकरे पत्रकारांवर चांगलेच भडकले.

नुकतेच राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर हा महाराष्ट्र म्हणजे माझा मतदार संघ असे जाहीर केले. पुन्हा राज यांनी आपण निवडणुका लढवणार नसल्याचे जाहीर केले. या संदर्भात आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय का फिरविला असा राज यांना अडचणीत आणणारा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. यावर राज यांनी याचा खुलासा मी नागपूर येथे केला आहे. माझ्या हाती सत्ता दिली तर मी पुढे येवून सत्तेचे नेतृत्व करेन असे सांगून बचाव करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणूक न लढवता राज सत्तेचे नेतृत्व करणार म्हणजे मागच्या दाराने विधान परिषदेवर जाणार असा याचा अर्थ होतो.

यामुळे दुसऱ्या एका पत्रकाराने तुम्ही विधान परिषदेवर जाणार का असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्नही राज यांना अडचणीचा ठरला आणि राज ठाकरे चांगलेच अस्वस्थ झाले. इतक्यात पहिल्या पत्रकाराने पुन्हा तुम्ही पलटी का मारली असा प्रश्न विचारला असतात अस्वस्थ झालेल्या राज यांनी आवाज चढवत शब्द जरा जपून वापरा, मला कठघऱ्यात उभे करू नका असे या पत्रकाराला सुनावले. या आधीही राज ठाकरे यांनी कित्तेक वेळा पत्रकारांचा पानउतारा केला आहे. तरीही पत्रकार अजून काही सुधरलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.

काही पत्रकार राजकीय नेत्यांचे तळवे चाटत, तर काही पत्रकार तर राज यांच्यासारख्या नेत्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात दिवस रात्र पडलेले असतात यामुळे राज यांच्या सारखे  नेते इतर पत्रकारांनाही काहीही पुढ्यात फेकले तरी चाटून खाणारे असेच समजत आले आहेत. आपला निवासस्थानी, कार्यालयात पडलेले पत्रकार जसे आपल्या इशाऱ्यावर माना हलवतात तसेच इतर पत्रकारांनीही माना हलवाव्यात अशी अपेक्षा या नेत्यांची असते. एकमात्र नक्की कि आज चाटू पत्रकार निर्माण झाले असले तरी चांगले पत्रकार सुद्धा आहे हे या निमित्ताने समोर आले आहे.

पत्रकारांनीही आपला पानउतारा करतील अश्या नेत्यांना टाळण्याची गरज आहे. अश्या नेत्यांवर पत्रकारांनी बहिष्कार घालून काही महिने यांना प्रसिद्धी न दिल्यास असे नेते वठणीवर येवू शकतात. पत्रकारांशी कसे वागावे कसे बोलावे हे सुद्धा त्यांना या बहिष्काराच्या काळात चांगलेच कळू शकते. परंतू त्यासाठी पत्रकारांना खंबीर बनावे लागेल. चाटूगिरी करणारे पत्रकार असे खंबीर बनू शकतील याबाबत मात्र शंका आहे.