Saturday 18 October 2014

पत्रकार कक्षातील चोऱ्यांमुळे भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी

मुंबई महानगर पालिकेच्या पत्रकार कक्षामधून एका महिला पत्रकाराचा मोबाईल चोरी झाल्याने पत्रकार कक्षामध्ये सीसीटीव्ही लावण्याची तसेच पालिकेमध्ये येणाऱ्या भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची मागणी मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ व जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यांनी मुंबईच्या महापौर तसेच पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयात पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष बनवण्यात आला आहे. पालिकेने दिलेले प्रवेश पत्र ज्या पत्रकारांना दिले आहे अश्या पत्रकारांनाच या पत्रकार कक्षामध्ये प्रवेश असला तरी इतर अनेक पत्रकार आणि भुरटे पत्रकार या कक्षाचा वापर करत असतात. काही पत्रकार म्हणवणारे पण कोणत्याही वृत्तपत्रात नसणारे, ज्यांचा वृत्तपत्राचा आणि च्यानेलचा कोणताही संबंध नाही अश्या भुरट्या पत्रकारांचा या पत्रकार कक्षामध्ये वावर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

दिनांक १७ ऑक्टोबरला सायंकाळी दैनिक " पूर्णविराम " च्या राधिका यादव या महिला पत्रकाराचा मोबाईल पत्रकार कक्षामधून चोरी झाला आहे. यापूर्वी पुनम पोळ या महिला पत्रकाराच्या ब्याग मधून ३ हजार रुपये चोरी झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या पैकी फक्त मोबाईल चोरी झाल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पत्रकार कक्षामधील चोरांना पकडता यावे म्हणून सीसीटीव्ही लावण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

पालिकेतील पत्रकारांना बसण्यासाठी आणि बातम्या लिहिण्यासाठी योग्य प्रमाणात खुर्च्या, टेबल, संगणक इत्यादीची सुविधा देण्याची तसेच महिला पत्रकारांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्या महिला पत्रकाराचा मोबाईल चोरी झाला आहे हा मोबाईल चोरी करणारा एखादा भुरटा पत्रकारच असू शकतो. पत्रकार कक्षामधून अश्या चोऱ्या होऊ लागल्यास पत्रकारांना हा डाग लागण्याची शक्यता असल्याने सर्व पत्रकारांनी एकत्र येवून भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. 

=============================

सोबत - इमेल ची प्रत 
---------- Forwarded message ----------
Date: 2014-10-18 0:52 GMT+05:30
Subject: पालिकेतील पत्रकारांच्या समस्या आणि तक्रारी…

प्रती,                 
मा. महापौर 
मा. आयुक्त, 
मा. अतिरिक्त आयुक्त, 
मुंबई महानगर पालिका 
यांस


विषय - १ ) पालिकेतील पत्रकारांच्या समस्या आणि तक्रारी 
            २ ) पालिका वार्ताहर कक्षामध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत 
            ३)  भुरट्या पत्रकारांचा बंदोबस्त करण्याबाबत 

मा. महोदया / महोदय 

आम्ही मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनी "जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या ट्रेड युनियन कायदयाखाली नोंदणीकृत असलेल्या संघटनेशी सलग्न असलेल्या "मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ" या संघटनेची स्थापना १ मे २०१४ रोजी केली आहे. तशी माहिती आपल्याला आम्ही इमेल द्वारे दिली असून या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपल्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्रामधून आम्ही पालिकेमधील पत्रकारांच्या समस्या आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. 

पत्रकारांच्या समस्या आणि तक्रारी 

१ ) मुंबई महानगर पालिकेमधील पत्रकार कक्षामधून युनियनच्या सदस्या व पत्रकार संघाच्या अध्यक्षा राधिका यादव ( दैनिक - पूर्णविराम ) यांचा मोबाईल १७ ऑक्टोंबर २०१४ रोजी सायंकाळी ४. ४५ च्या दरम्यान चोरी झाला आहे. याबाबत पोलिस तक्रार देण्यात आली आहे. असाच प्रकार पुनम पोळ या पत्रकाराच्या बाबतीत घडला होता. या महिला पत्रकाराच्या ब्याग मधून ३ हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली होती. ( याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही ) पत्रकार कक्षा मध्ये चोरीचे प्रकार होत असल्याने चोरी करणारे पकडले जावेत तसेच चोरांना धाक बसावा यासाठी त्वरित सीसीटीव्ही क्यामेरे लावण्याचे आदेश देण्यात यावेत. 

२ ) पालिकेने वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना जनसंपर्क विभागाकडून प्रवेश पत्र देण्यात आली आहेत. यापैकी काही पत्रकारांची वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या अस्तित्वात नाहीत, काही पत्रकार संबंधित वृत्तपत्रात कामच करत नाहीत अश्या पत्रकारांची प्रवेशपत्र पालिकेने परत घ्यावीत व या पत्रकारांना पालिकेत येण्यास बंदी घालावी. 

३ ) पत्रकार म्हणवणारे काही लोक पत्रकार असल्याचे भासवून पत्रकार कक्षात स्वताबरोबर काही लोकांना घेवून येतात आणि सेटिंग करण्यासाठी पत्रकार कक्षाचा गैरवापर करतात, इतर पत्रकार नसताना अश्या पत्रकारांकडून पत्रकार कक्षाचा झोपण्यासाठी वापर केला जातो, तसेच फोनचा गैरवापर केला जातो अश्या लोकांवर पालिकेने कारवाही करावी. 

४ ) इतर महानगर पालिकेमध्ये जनसंपर्क विभागाकडून वेळोवेळी कोणते पत्रकार पालिकेच्या पत्रकार कक्षाचा वापर करतात याची शहानिशा केली जाते. तशीच शहानिशा मुंबई महानगर पालिकेने करावी. यामुळे पत्रकार कक्षामध्ये येणाऱ्या भुरट्या पत्रकारांवर अंकुश ठेवता येवू शकतो. 

५ ) मुंबई महानगर पालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकार वृत्त संकलन करण्यासाठी येत असल्याने या पत्रकारांना बसण्यासाठी व बातम्या लिहिण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाही. यामुळे पत्रकारांना बातम्या पाठवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने पत्रकारांच्या संख्ये प्रमाणे टेबल व खुर्च्यांची सोय करावी. पत्रकार कक्षामध्ये दोनच संगणक असल्याने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पत्रकारांना हे संगणक काही वेळा बातम्या पाठवण्यासाठी मिळत नसल्याने संगणकांची सख्या वाढवावी. काही पत्रकार ल्यापटॉप वापरत असल्याने त्यासाठी तशी सोय करून देण्यात यावी. जेणे करून पालिकेच्या पेपरलेस कारभाराला यामुळे चालना मिळेल. 

६ ) पत्रकारांना कित्तेक वेळा बातम्या पाठवण्यास उशीर होत असतो. सायंकाळी पालिका मुख्यालयात पत्रकार कक्षाच्या बाजूला शुकशुकाट असतो. त्यातच शौचालय पत्रकार कक्षा बाहेर असल्याने व शौचालयाच्या बाजूला कोणीही नसल्याने महिला पत्रकारांची कुचंबना होते. अश्या वेळी पालिकेच्या महिला सुरक्षा रक्षकांकडून याठिकाणी गस्त घालण्यात यावी. 

पालिकेतील पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या व पत्रकारांना आवश्यक असलेल्या सुविधा आपल्याला आमच्या संघटने मार्फत आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत. तरी या समस्या दूर करून पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावात हि विनंती. 

आपले विश्वासू, 
मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ
जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र