Sunday 2 November 2014

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायदे करण्याचा मानस - मुख्यमंत्री फडणवीस

पत्रकार आणि प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायदे करण्याचा मानस आहे. अन्य राज्यांच्या धर्तीवर पत्रकारांसाठी पेन्शन योजना राबविण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचा मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाने सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 
आजवर विधिमंडळातील कामात तसेच जनतेचे प्रश्न मांडताना नेहमीच पत्रकारांचे सहकार्य लाभले. आज पत्रकारांना सामोरे जाताना मनावर दडपण आहे. कारण, आता माझी भूमिका बदलली आहे. जनतेने खूप अपेक्षेने आम्हाला निवडून दिले आहे. मात्र, या अपेक्षांचे ओझे वाटत नसून ती एक जबाबदारी असल्याची जाणीव आहे. ती पार पाडण्यासाठी पत्रकारांचेही सहकार्य लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

विरोधी पक्षात काम करत असताना पत्रकारांचे मोठे सहकार्य मिळाले. तसे पत्रकारांचे विरोधी पक्षांतील नेत्यांवर जास्त प्रेम असते. आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवरही प्रेम करा. अर्थात, विकासाभिमुख पारदर्शी काम करण्यासाठी तुमचे सहकार्य हवे आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी​नंतर निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री या नात्याने पत्रकार परिषद घेण्याची प्रथा मी सुरू करेन. सरकारचे योग्य निर्णय जनतेला समजायला हवेत. माहिती न दिल्यास वेगवेगळ्या बातम्या येत असतात. तसे घडू नये याची काळजी घेईन, असे ते म्हणाले.