Friday 6 February 2015

वादग्रस्त मजकुराबद्दल पेपर विक्रेत्याला दोष का ?

मुंबई : पॅरिसमधील 'चार्ली हेब्डो' या व्यंगचित्र साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र छापल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या मुंब्य्रातील 'अवधनामा' या उर्दू दैनिकाची विक्री करणार्‍या वृत्तपत्र विक्रेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे. दैनिकातील वादग्रस्त मजकुराबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांना जबाबदार का धरायचे? असा सवाल उपस्थित करत शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पॅरिसमधील 'चार्ली हेब्डो' व्यंगचित्र साप्ताहिकात मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र छापले गेले होते. तेच वादग्रस्त व्यंगचित्र मुंब्रा शहरातील 'अवधनामा' या उर्दू दैनिकाने १७ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. त्या प्रकरणी पोलिसांनी 'अवधनामा'चे संपादक शिरीन दळवी यांना अटक केली.या कारवाईला काही दिवस उलटत नाही तोच जे. जे. मार्ग पोलिसांनी चक्क वृत्तपत्र विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने वृत्तपत्र विक्रेत्यांत संतापाची लाट उसळली आहे. वृत्तपत्रांतील वादग्रस्त मजकुराबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांना जबाबदार कसे धरता येईल? असा सवाल शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी केला आहे. केवळ वृत्तपत्रांची विक्री करणे हे आमचे काम आहे. आम्ही वितरकांकडून वृत्तपत्रे घेतो व ती स्टॉल वा दारोदारी विकतो. प्रत्येक स्टॉलवर अनेक दैनिके-मासिके विकली जातात. त्यामुळे प्रत्येक दैनिक-मासिकात काय छापले आहे, हे आम्हाला ठाऊक नसते, अशी प्रतिक्रिया वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या एका पदाधिकार्‍याने दिली.