Thursday 6 August 2015

याकूबला 'शहीद' म्हणणारा पत्रकार फरार

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन फासावर लटकल्यानंतर, फेसबुकवर त्याला 'शहीद' म्हणणाऱ्या आणि आयसिसचा प्रवक्ता होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका धर्मांध मुस्लिम व्यक्तीचा शोध मुंबई क्राइम ब्रँच घेत आहे. झुबेर अहमद खान असं त्याचं नाव असून तो नवी मुंबईचा रहिवासी असल्याचं कळतं. पण, पोलीस मागे लागल्याचं कळताच तो फरार झाला आहे.
 
याकूब मेमनच्या फाशीनं अनेकांना दुःख झालंय. सरकारनं टायगरच्या चुकीची शिक्षा याकूबला दिली, याकूबची हत्या केली, असा आरोप करत गळे काढले जाताहेत. या फाशीनंतर काही धर्मांध मुस्लिमांनी सोशल मीडियावरून अत्यंत तीव्र, प्रक्षोभक पोस्ट टाकल्यात. झुबेर अहमद खानही त्यापैकीच एक. त्याच्या पोस्टनं फेसबुक, ट्विटरवर खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं याकूबचा उल्लेख शहीद असा केलाय. इतकंच नव्हे तर, त्याच्या फाशीचा बदला घेण्यासाठी भारतीय नागरिकत्व सोडून आपल्याला आयसिसमध्ये जायचं असल्याचंही त्यानं म्हटलंय. खलिफ बगदादीच्या नावे लिहिलेल्या या संदेशात, त्यानं आपल्याबद्दलची सगळी माहिती दिली आहे. आपण पत्रकार असल्याचा दावा त्यानं केला आहे आणि आयसिसचा प्रवक्ता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

ही पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर काही जागरूक नेटकऱ्यांनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस झुबेरच्या मागावर आहेत. नवी मुंबईहून तो वांद्र्यात आल्याचं पोलीस तपासादरम्यान उघड झालंय, पण आता त्याचा पत्ता लागत नाहीए. मी राजधानी एक्सप्रेसनं दिल्लीला पोहोचेन आणि इराक दूतावासात जाऊन माझी इच्छा सांगेन, असं झुबेरनं १ ऑगस्टच्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे आता दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनवर पोलिसांचं लक्ष आहे. 

दरम्यान, झुबेर अहमद खाननं या आधीही सोशल मीडियावर अशा अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचं पोलीस तपासा दरम्यान समोर आलंय. त्याच्या काही पोस्ट नेटिझन्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पर्यंतही पोहोचवल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. या निमित्तानं सोशल मीडियावरच्या इतरही वादग्रस्त पोस्टवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.