Monday 14 October 2013

बेरक्या

बघा पत्रकारासाठी 
लढतो आहे बेरक्या 
विरोधकांच्या त्याने 
गारद केल्या टोळक्या !

पत्रकारांच्या शत्रूंचा 
तो कर्दनकाळ आहे 
त्याची एक पोस्ट 
कानामागे जाळ आहे !!


पत्रकारांचे रक्षण 
मुद्धा कळीचा आहे 
कायदा झाला पाहिजे 
गुद्धा टाळीचा आहे !!!

विलास फुटाणे 
मो न .८४४६७९६५५७

http://www.patrakarmitra.com/2012/12/blog-post_18.html मधून साभार 

ग्रामीण वार्ताहर : पत्रकारीतेचा दुर्लक्षित केंद्रबिंदू

आधुनिकतेच्या कोणत्याही सोयीसुविधा नसूनही बदलल्या परिस्थितीशी जूळवून घेत नेटाने पत्रकारीता करणार्‍या ग्रामीण भागातील असंख्य वार्ताहरांमुळे त्या वृत्तपत्राची शान असते. महाराष्ट्रातील अधिकाधिक जिवन ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. हा ग्रामीण भाग कृषी आणि शेतकरी या परिघातच फिरतो. मोठ्या उद्योगधंद्याशी या भागाचा क्वचितच संंबंध येतो. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अशी अनेक खेडी आहेत जेथे अजून साधे रस्ते सुध्दा नाहीत. दळणवळण, फोन आदी सुविधा नाहीत. तेथील लोक नागरी सुविधेपासून वंचित आहेत. सरकारी कागदपत्रांसाठी रोजमजुरी बुडवून दररोज तालुक्याच्या चकरा मारत आहेत. अनेक लोक धनाढ्यांच्या सावकारी पाशात फसून कर्जबाजारी झाले आहेत. अनेकांच्या जिवनावर गावगुंडांची दहशत आहे. अशांच्या वेदनांना वृत्तपत्रांत मांडून त्यांच्यावर होणारा अन्याय दुर करण्याचे महत्वाचे कार्य ग्रामीण वार्ताहरावर असते. त्याच्यावर वृत्तपत्रसमुहाचे दडपण आणि स्पर्धा असतेच असते. एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याची बातमी लिहीण्याचे दायित्व त्याच्यावर असते तसेच बातमीसंदर्भात उमटणार्‍या चांगल्या वाईट पडसादांना त्यालाच झेलावे लागते. बातमी संबंधी अनेक वेळा त्याला खिशातले पैसे खर्चून तालुक्याला जावे लागते. बातमी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. अनेक वर्षे इमाने इतबारे पत्रकारीता करुन सुध्दा पत्रकारीतेतील हा महत्वाचा भाग चंद्रग्रहणाप्रमाणे सदैव झाकोळलेलाच राहतो. ग्रामीण वार्ताहराच्या जिवावर पत्रकारीता करणार्‍या वृत्तपत्राच्या संपादकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळतात. मात्र खर्‍या अर्थाने पत्रकारीता करणारा हा ग्रामीण वार्ताहर मात्र वृत्तपत्र मालकाच्या लेखी व शासनाच्या लेखी अजुनही दुर्लक्षितच आहे. नाही म्हणायला त्याच्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक ग्रामीण स्तरावरील संघटना आहेत. मात्र अशा संघटनंाचे कर्तेधर्ते अशांची गर्दी जमवून स्वत:चा मोठेपणा व स्वत:चा फायदा करवून घेतांना दिसतात. एखाद्या बातमी संदर्भात वाईट प्रवृत्तीकडून त्याला जिवे मारण्याच्या धमक्या येतात. त्याला मारहाण केली जाते. अशा वेळी संंबंधीत वृत्तपत्र मालकाकडून त्याची बाजू घेतल्या जात नाही. त्याला नैतिक पाठबळ दिल्या जात नाही. केवळ त्याचा वापर करुन घेतला जातो. १०-१५-२० वर्षे पत्रकारीता करुनही त्याची गणना वार्ताहरातच केल्या जाते. जाहिरातींचे भरगच्च टारगेट  त्याच्यावर लादले जाते मात्र तुटपुंजेच कमीशन त्याच्या हातावर ठेवले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असे अनेक बुध्दीमान पत्रकार केवळ कोणत्याही प्रकारचे पाठबळ व सोयीसुविधा नसल्यामुळे जिथल्यातिथेच खितपत पडलेले आहेत. जिवनाचा उमेदीचा भाग पत्रकारीतेत घालविल्यानंतरही त्यांच्यावर पत्रकारीतेचा शिक्का बसत नाही. केवळ वृत्तपत्राचा वार्ताहर आहे म्हणून त्याला शासनाच्या सर्व सोयीसुविधा नाकारल्या जातात. अनेक भांडवलशाही वृत्तपत्रे तर केवळ त्याचा वापर करुन घेतांना दिसतात. त्यामुळे अनेकजण नाउमेद होवून पत्रकारीतेच्या या प्रवाहातून बाहेर पडतांना दिसतात. 
पत्रकारीता हा एक व्यवसाय नसून समाजसेवेचे व्रत आहे. व खरी समाजसेवा ग्रामीण भागात राहून पत्रकारीता करणारा वार्ताहरच करतो यात काही दुमत नाही. बातमीसाठी धावपळ करणे, फोटो काढणे, फॅक्स करणे आदी कसरती त्याला कराव्या लागतात. ग्रामीण भागातील एखाद्या रेशनमाङ्गीयाच्या विरोधात बातमी छापली तर दुसर्‍या दिवशी त्याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळतात. अशा वेळी त्या वृत्तपत्राचे मालक त्यांच्या पाठीशी उभी राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जिल्हास्तरावरील वृत्तपत्रांची सगळी भिस्त ग्रामीण बातम्यांवर असते. जास्तीत जास्त राजकारण ग्रामीण भागात असते. ग्रामीण भागातील लोकांच्या विविध समस्या असतात. शासनातील पुढारी व अधिकार्‍यांच्या वागणूकीने त्रस्त झालेल्या लोकांना ग्रामीण वार्ताहर हा देवदूतच वाटतो. त्यामुळे त्याच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड अपेक्षा वाढलेल्या असतात. अनेक लोक केवळ ग्रामीण भागातील बातम्यांसाठीच वृत्तपत्रे विकत घेतात. ग्रामीण भागातील नागरीकांच्या लाभासाठी असणार्‍या विविध योजनांना ग्रामीण भागापर्यत कसे पोहचविण्याचे कसबही वार्ताहरांना पार पाडावे लागते. त्याचबरोबरच एखादी मोठी घटना घडल्यास त्याची इत्यंभूत बातमीही वृत्तपत्रांपर्यत पोहचवावी लागते. त्यासाठी त्याला प्रत्येक वेळेस चौकस राहावे लागते. अशावेळी एखादे वेळेस एखादी बातमी सुटली तर त्याच्यावर मोठे दडपण येते. वृत्तपत्रांनी महिन्याकाठी दिलेले ठराविक टारगेट पुर्ण करण्यासाठी त्याला जिवाचा आटापिटा करावा लागतो. प्रसंगी एकदुसर्‍याची दुष्मनीही विकत घ्यावी लागते. इतकी सर्व मेहनत घेत असतांना पत्रकारीतेतील हा महत्वाचा घटक शासन किंवा वृत्तपत्रांच्या दरबारी कायम दुर्लक्षितच राहतो. बातम्यांसाठी जिवावर उदार होवून खरी पत्रकारीता करणार्‍या ह्या ग्रामीण वार्ताहरांसाठी वृत्तपत्रांकडून किंवा शासनाकडून कोणत्याही स्वरुपाची जिवनाच्या सुरक्षीततेची हमी दिल्या जात नाही. त्यालाच वरच्यांची मर्जी सांभाळावी लागते. पत्रकारीतेतील हे खाचखळगे सहन करीत असतांना बेभरवशाच्या या पत्रकारीतेचा वारसा तो आपल्या मुलांमध्ये जोपासतील काय ? या प्रश्‍नातील भयाण वास्तव समस्त पत्रकार जगताला सतावत आहे.

संदिप पिंपळकर, वाशीम
भ्रमणध्वनी : ९८२२०४७०६८