Friday 30 May 2014

'नेटवर्क १८ 'वर रिलायन्सचा ताबा, राजदीप आणि सागरिका यांचा राजीनामा

रिलायन्स इंडस्ट्रीजने आज "नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट' (एनडब्ल्यू १८) तसेच दुय्यम अंगभूत कंपनी "टीव्ही १८ ब्रॉडकास्ट' यांचा ताबा मिळविला आहे. यामुळे जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तर नेटवर्क १८ चे कार्यकारी संचालक राघव बहल हे सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने चार हजार कोटी रुपयांचा निधी "इंडिपेंडंट मीडिया ट्रस्ट'ला (आयएमटी) मंजूर केला. रिलायन्स इंडस्ट्रीज ही "आयएमटी'ची एकमेव लाभार्थी आहे. डिजिटल इंटरनेट प्रॉपर्टीज, ई-कॉमर्स बिझनेस आणि ब्रॉडकास्ट कंटेंटचा ताबा "एनडब्ल्यू १८' कंपनीकडे होता. "आयएमटी'चा निधी "एनडब्ल्यू १८' आणि "टीव्ही १८' यांचा ताबा मिळविण्यासाठी वापरण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा "एनडब्ल्यू'मध्ये ७८ टक्के आणि "टीव्ही १८' मध्ये ९ टक्के मालकीहक्क असणार आहे. या व्यवहारामुळे रिलायन्सच्या "फोर-जी' व्यवसायाच्या जोडीला दूरसंचार, वेब आणि डिजिटल कॉमर्सला चालना मिळेल. सध्या डिजिटल प्रॉपर्टीमध्ये "इन डॉट कॉम', "आयबीएन लाइव्ह', "मनी कंट्रोल', "फर्स्ट पोस्ट', "क्रिकेट नेक्‍स्ट', "होम शॉप १८', "बुक माय शो' यांचा, तसेच "कलर्स', "सीएनएन आयबीएन', "सीएनबीसी टीव्ही १८', "सीएनबीसी आवाज' या वाहिन्यांचा समावेश आहे.