Tuesday 7 January 2014

समाजाला विधायक दिशा देण्यात पत्रकारांचे महत्वपूर्ण योगदान - राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील

कोल्हापूर : समाजातील चांगल्या - वाईट बाबींचा सातत्याने पाठपुरावा करुन समाजहित साधण्याबरोबरच समाजाला विधायक दिशा देण्यात पत्रकारांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन बिहार राज्याचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.

दसरा चौक येथील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर प्रेस क्लब यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने सन 2013 साठी देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट छायाचित्रकार व उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार अनुक्रमे बाबुराव रानगे, बी. डी. चेचर व रणजित बागल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालिका श्रध्दा बेलसरे, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, श्री रवळनाथ को-ऑफ हौसिंग फायनान्स सोसायटी आजराचे अध्यक्ष एम. एल. चौगुले आदी उपस्थित होते.

राज्यपाल डॉ. पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या लेखनीतून समाज विकासासाठी चौफेर लिखाण केले व समाजातील प्रश्न ताकदीने मांडले. बाळशास्त्री जांभेकर यांचा हा वारसा आजच्या पत्रकार तेवढ्या ताकदीने पेलला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. याला पत्रकारिताही अपवाद नाही. त्यामुळे नवनवीन विषय मांडणे महत्वाचे आहे. यासाठी पत्रकारांचे वाचन व चिंतन महत्वाचे आहे. त्याचबरोबरच सकारात्मक विचारातून ध्येयपूर्ती होत असते. हे सकारात्मक विचार पत्रकारितेतून सातत्याने समाजात रुजवायला हवेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची विधायक पत्रकारितेची भूमिका
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालिका श्रध्दा बेलसरे म्हणाल्या, शासन आणि जनता यांच्यामधील समन्वयाचा दुवा म्हणून महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यरत आहे. शासनाचे निर्णय, कार्य व विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम या विभागाव्दारे केले जाते. लोकराज्य, महान्यूज, जय महाराष्ट्र, दिलखुलास अशा शासकीय मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांव्दारे शासनाची भूमिका सातत्याने जनतेपर्यंत पोचविली जाते. या दृष्टीने विधायक अशा पत्रकारितेची भूमिका हे महासंचालनालय निभावत आहे. जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी ऐतिहासिक घडामोडीचे व राष्ट्रीय महापुरुषांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे आणि चित्रीकरणाचे जतन या विभागाव्दारे करण्यात आले आहे. याप्रसंगी कोल्हापूर माहिती विभागाच्या उपसंचालिका वर्षा शेडगे, कोल्हापूर प्रेस क्लबचे सचिव संभाजी गंडमाळे, प्रेस क्लबचे सदस्य, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.