Tuesday 7 January 2014

पत्रकारितेतील घटकांनी समीक्षकाची भूमिका बजावावी - राजीव जाधव

रत्नागिरी : पत्रकारांनी समाजातील घटनांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करुन समीक्षकाच्या भूमिकेतून त्या समाजापुढे मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी केले. `दर्पण दिनानिमित्त` जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, रशीद साखरकर, राजेंद्र चव्हाण, शोभना कांबळे, दिपक पटवर्धन, धनश्री पालांडे, प्रमोद कोनकर, दत्तात्रय महाडिक आदी उपस्थित होते.



जाधव म्हणाले, पत्रकारिता हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम असून त्याद्वारे समाजाला दिशा देण्याची महत्वाची जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी. गतीमान जगात समाजाची चांगली बाजू समोर आणण्यासाठी वृत्तपत्रे ही महत्वाची ठरतात. पत्रकार बांधवांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवाव्यात.

यावेळी इतर मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांना व मान्यवरांना विविध पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील पत्रकार व इलेक्ट्रानिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

तत्पूर्वी जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर व हरिश्चंद्र गीते यांनी दर्पणकारांनी समाजप्रबोधनासाठी केलेल्या पत्रकारितेची आठवण करुन देत त्यांचा आदर्श भावी पिढीने पुढे चालविण्याचे आवाहन केले. यावेळी पत्रकार रविंद्र साळवी, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.