Thursday 27 February 2014

पेडन्यूजवर प्रशासन ठेवणार करडी नजर

लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रसारमाध्यमांमधील पेड न्यूज आणि जाहिरातींवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली.


प्रसारमाध्यमांमधील संभाव्य अनुचित प्रकारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर र्निबध घातल्याचे कवडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीच त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक बुधवारी झाली. त्यानंतर कवडे म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती प्रमाणित करून घ्याव्या लागणार असून, ही काळजी राजकीय पक्ष व उमेदवारांनाच घ्यावी लागेल. तीन दिवस आधी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. वर्तमानपत्रांमधील प्रचारकी थाटाच्या बातम्यांचेही तर्पण होणार आहे. तक्रार आल्यानंतरच त्याची दखल घेतली जाईल असे नाहीतर अशा गोष्टींची ही समितीच दखल घेणार आहे. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांचा प्रचार केवळ जाहिरातीतूनच झाला पाहिजे, बातम्यांमधून तो होऊ नये अशाच निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत असे कवडे यांनी सांगितले.