Thursday 20 March 2014

महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्यांना कोठडी - त्यानंतर जामिनावर मुक्तता


jia
मुंबई - हिंदी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अंधेरी पश्‍चिमेला व्ही. पी. रोड येथे युनायटेड सोसायटीजवळ सोमवारी (ता. 17) हा प्रकार घडला होता. 



धुळवडीचे वृत्तांकन करून सहकाऱ्यांसोबत कॅमेरामन मित्राच्या घरी जाताना क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांच्या एका गटाने वृत्तवाहिनीचे वाहन अडवून आत बसलेल्या चालक, कॅमेरामनसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या वेळी वाहनातील महिला पत्रकाराने मोबाईल फोनमधून रेकॉर्डिंगला सुरुवात केल्यावर जमावातील इकरार इब्रा हिम सय्यद (18) याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. हा मोबाईल मागण्यासाठी महिला पत्रकार गेल्यावर तिचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी इकरार याच्यासह मुजावर सय्यद (20), इब्राहिम सईद (48), इस्तियाक (26) यांना अटक केली. आरोपींमध्ये एका 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे. या पाचपैकी चौघांना आज सकाळी न्यायालयासमोर, तर अल्पवयीन मुलाला बालन्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.