Sunday 20 April 2014

पत्रकारांमधील स्वाभिमान मेला

टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी, आणि सीएनएन-आयबीएनचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या .या मुलाखती म्हणजे प्रश्न कसे विचारू नयेत आणि त्याला उत्तरं कशी देऊ नयेत याचं उत्तम उदाहरणं होत्या.मुलाखत देणारा कोणी आरोपी नसतो हे जसं खरंय तसंच मुलाखत घेणाराही कोणी भिकारी नसतो हे सत्य दोन्ही बाजु विसरल्या आणि पत्रकारिता आणि राजकारणाची पातळी कोणत्या थराला गेलीय याचां प्रत्यय दोन्ही बाजुंनी जगाला आणून दिला .

न आवडलेला प्रश्न गोस्वामी यांनी विचारला तेव्हा माईक फेकून देण्याची भाषा राज ठाकरे यांनी वापरली. अपशब्द वापरले तेव्हा कॅमेऱा बंद करून निघून जाण्याची तयारी राजदीप यांनी का दाखविली नाही असा प्रश्न तमाम पत्रकारांना पडलाय.असं झालं असतं तर ही घटना पत्रकारांमधील स्वाभिमान अजून मेलेला नाही याचं उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहिली असती.तसं झालं नाही याचं नक्कीच दुःख आङे. राज ठाकरे जसे एका पक्षाचे नेते आहेत तव्दतच राजदीप सरदेसाई देखील देशातील मान्यवर पत्रकारांपैकी एक आहेत हे विसरून चालणार नाही. राजकारण्यांना सोयीचेच प्रश्न विचारावेत अशी अपेक्षा असते.तसं झालं नाही तर ते पत्रकारांवर भडकतात.अगदी शऱद पवारही त्याला अपवाद नाहीत.परवा अजित पवारांच्या विषयावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा पवार पत्रकारावर भडकले.पत्रकार अगदी मोठे पत्रकारही हे सारं खपवून घेतात त्यामुळं असे प्रकार वाढत आहेत.पत्रकारांनी स्वाभिमानाचं दर्शन घडविल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत.