Saturday 5 April 2014

शक्ती मिल अत्याचार प्रकरण-तिघांना फाशी



मुंबई : दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणापाठोपाठ संपूर्ण देश हादरवणार्‍या शक्ती मिल सामूहिक अत्याचार प्रकरणात सत्र न्यायालयाने शुक्रवारी तिघा नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. आधी टेलिफोन ऑपरेटर व नंतर छायाचित्रकार तरुणीवर पाशवी अत्याचार करून मुंबईची अब्रू वेशीला टांगणार्‍या विजय जाधव, कासीम बंगाली व मोहम्मद सलीम अन्सारी या नराधमांना सहानुभूती दाखवल्यास न्यायव्यवस्थेची विटंबना होईल, असे मत व्यक्त करत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील चौथा दोषी सिराज रेहमान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.


कलम ३७६ (ई) अंतर्गत पहिल्यांदा फाशी
डिसेंबर २0१२ मध्ये राजधानी नवी दिल्लीत नराधमांनी धावत्या बसमध्ये तरुणीवर झडप घालून तिच्यावर निर्दयीपणे सामूहिक अत्याचार केला. जागतिक स्तरावर देशाची मान शरमेने खाली घालायला लावणार्‍या या घटनेनंतर क्रूर नराधमांना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यासाठी भादंवि कलम ३७६(ई)मध्ये सुधारणा करण्यात आली. याच सुधारित तरतुदीनुसार 'शक्ती मिल'मधील तिघा सराईत नराधमांना शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली गेली. या कलमांतर्गत फाशीची शिक्षा सुनावली जाण्याचा हा पहिला खटला ठरला आहे.महालक्ष्मी येथील निर्जन शक्ती मिलच्या आवारात गेल्या वर्षी २२ ऑगस्ट रोजी इंग्रजी मासिकात काम करणार्‍या छायाचित्रकार तरुणीवर नराधमांनी अमानवीपणे सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने मुंबईकर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येताच ३१ जुलै रोजी त्याच नराधमांची 'भक्ष्य' बनलेल्या टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील अत्याचाराला वाचा फुटली. या दोन असाहाय्य तरुणींवर सामूहिकरीत्या पाशवी अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात ५ जणांना दोषी ठरवले. त्यातील चौघांना टेलिफोन ऑपरेटवर तरुणीवरील अत्याचारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावत छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचाराचा फैसला न्यायालयाने राखून ठेवला होता. दोन्ही प्रकरणांत विजय जाधव (१९), कासीम बंगाली (२१) आणि मोहम्मद सलीम अन्सारी (२८) या तीन नराधमांचा सहभाग उघडकीस आल्याने प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी गुरुवारी त्यांना भादंवि कलम ३७६(ई) अन्वये दोषी ठरवले होते तर अंतिम निकाल शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवला होता. शुक्रवारी सुनावणी सुरू होताच सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नराधमांना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. नराधमांच्या हातून घडलेले कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे. त्यांना फासावरच लटकवले पाहिजे, ज्यामुळे नवे नराधम उदयाला येणार नाहीत, असा युक्तिवाद अँड़ निकम यांनी केला. या वेळी बचाव पक्षाने आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा न सुनावण्यासाठी याचना केली. तथापि, दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेत प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी तीन नराधमांना गुन्ह्याच्या पुनरावृत्तीसाठी फाशी आणि अनैसर्गिक शारीरिक संबंधांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील चौथा आरोपी सिराज रेहमान याला न्यायालयाने जन्मठेप सुनावली.