Saturday 5 April 2014

‘एपी’च्या पत्रकाराची हत्या

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 'असोसिएटेड प्रेस' (एपी) या वृत्तसंस्थेच्या फोटोग्राफरचा मृत्यू झाला, तर पत्रकार जखमी झाला. अंजा नाईद्रिंगॉस (वय ४८) या जर्मनीतील प्रसिद्ध फोटोग्राफर आणि वार्ताहर कॅथी गॅनन या दोघीही कारमध्ये बसल्या होत्या. त्या वेळी अफगाणिस्तान पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात अंजा मृत्युमुखी पडल्या, तर कॅथी जखमी झाल्या. कॅथी या 'एपी'च्या अनेक वर्षांपासूनच्या वार्ताहर होत्या. सध्या त्या या वृत्तसंस्थेच्या अफगाणिस्तान ऑफिसच्या प्रमुख आहेत. या भागातील एक वरिष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

'अफगाणिस्तानातील संघर्षाचे वार्तांकन करण्यासाठी अंजा आणि कॅथी दोघीही गेली काही वर्षे तेथे वास्तव्यास आहेत. अंजा या अत्यंत गुणवान पत्रकार होत्या. उत्तम फोटोंसाठी त्या प्रसिद्ध होत्या,' असे 'एपी'चे कार्यकारी संपादक कॅथलीन कॅरोल यांनी म्हटले. अफगाणिस्तानातील तानी जिल्ह्यातील खोश्ट शहरातील निवडणुकीसाठी मतपेट्या देण्यासाठी जात असलेल्या ताफ्याबरोबर दोघीही प्रवास करीत होत्या. त्यांना लष्कर आणि पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते. त्या दोघी कारमध्ये बसून ताफा पुढे सरकण्याची वाट पाहात होत्या. त्या वेळी एका तुकडीचा कमांडर नकीबुल्लाह कारजवळ आला आणि 'अल्ला हो अकबर' असे म्हणून अचानक एके-४७ मधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच त्याला पोलिसांनी गराडा घातला आणि अटक केली.
--