Wednesday 21 May 2014

जनसंपर्क अधिकाऱ्याकडून जाहिराती बंद करण्याच्या धमक्यांमुळे पत्रकाराची नोकरी गेली

मुंबई महानगर पालिकेमध्ये दैनिक "मुंबई तरुण भारत" या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलन करणाऱ्या पुनम पोळ या महिला पत्रकाराने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या शौचालायामधील स्ल्याब पडल्याची, पाणी गळत असल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. जनसंपर्क अधिकाऱ्याने वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करण्याच्या धमक्या दिल्याने पोळ यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. 
मुंबई महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले पाटील यांच्या कार्यालयामधील शौचालयाचे स्ल्याब काही दिवसांपूर्वी कोसळले आहे. या स्ल्याब मधून गेले काही महिने पाणी गळत असल्याने स्ल्याब पडले आहे. स्ल्याब कोसळून एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याचा अपघात होऊ नये म्हणून मुंबई मधून चार ते पाच वृत्तपत्रांनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या. अशीच बातमी मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रात सुद्धा प्रसिद्ध झाली. शौचालयाची बातमी प्रसिध्द झाली असताना या बाबत मेंटनंस विभाग जबाबदार असताना जनसंपर्क अधिकार्याने हि बातमी आपल्यावरच प्रसिद्ध झाली आहे यामुळे आपली बदनामी झाली आहे गैरसमज करून घेतला आहे. 

आपल्या विभागाच्या विरोधात बातम्या आल्याच्या गैरसमजातून खवळलेल्या जनसंपर्क अधिकारयाने थेट मुंबई तरुण भारतच्या कार्यालयामध्ये फोन करून जाहिरात विभागाच्या प्रतिनिधीना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले आणि सरळ तुमच्या जाहिराती बंद करू अशी धमकी दिली. यावेळी बातमी देणाऱ्या पुनम पोळ यांना तुम्ही चौकडी मध्ये असता, तुम्ही नवीन ग्रुप केला आहे, तुमची नवीन बॉडी आहे, तुम्ही माझ्या विरोधात बातम्या लावता का असे बोलून मी या महानगर पालिकेमध्ये सात महापौर बसवले आहेत अश्या फुशारक्या जनसंपर्क अधिकाऱ्याने मारल्या आहेत. 

दैनिक मुंबई तरुण भारतच्या प्रशासनाने देखील वृत्तपत्राच्या जाहिराती बंद होणार या भीतीने थेट बातमी खरी कि खोटी याची कोणतीही शहानिशा न करताच बातमी देणाऱ्या पुनम पोळ नावाच्या महिला पत्रकाराला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. पोळ यांना काढण्याचा निर्णय घेतल्यावर ल्यापटॉप परत करायला सतत फोन करणाऱ्या वृत्तपत्रातील प्रशासनाने या पोळ यांना कामावरून काढताना तिला का काढण्यात आले याचे साधे उत्तर देण्याची तसदी देखील घेतलेली नाही. 

महाराष्ट्र शासनाच्या डीजीपीआर मध्ये नोंद असलेल्या प्रत्तेक दैनिकाला पालिकेने रोटेशन पद्धतीने जाहिरात दिली पाहिजे असा नियम आहे. शासनाच्या यादीवरील कोणत्याही वृत्तपत्राच्या जाहिराती बंद करण्याच्या अधिकार जनसंपर्क अधिकाऱ्याला नसताना जाहिराती बंद करण्याच्या धमक्या देण्याचे काम जनसंपर्क अधिकाऱ्याने केल्याने पुनम पोळ या पत्रकाराला आपली नोकरी गमवावी लागली आहे. या संदर्भात पोळ यांनी पालिका आयुक्ताना पत्र देवून जाहिराती बंद करण्याच्या धमक्या देवून आपली नोकरी घालवणाऱ्या जनसंपर्क अधिकारी विजय खबाले पाटील यांच्यावर कायेदशीर कारवाही करावी अशी मागणी केली आहे. 

दरम्यान पालिकेत येणाऱ्या पत्रकाराला कोणत्याही सोयी सुविधा मिळवून देण्याकडे दुर्लक्ष करण्याच्या वार्ताहर संघाच्या कारभाराला कंटाळून इथील काही पत्रकारांनी एकत्र एवुन "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" स्थापन केला आहे. नवीन स्थापन झालेला पत्रकार संघ आपल्याला जुमानत नसल्याने चवताळलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्याने या पत्रकार संघामधील क्रियाशील असलेल्या पुनम पोळ यांनाच नोकरीवरून काढल्याने सर्व पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

पुनम पोळ यांना सर्व पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटनांकडून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असून वेळ प्रसंगी जनसंपर्क अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्यास ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथील महानगर पालिका तसेच मंत्रालय, पत्रकार संघ, प्रेस क्लब येथील पत्रकारांनी पाठींबा दर्शवला आहे. पोळ यांनी केलेल्या मागणी नुसार कारवाही करण्यास आयुक्तांनी दुर्लक्ष केल्यास लवकरच आयुक्तांना घेराव घालण्याचा निर्णय सर्व पत्रकारांनी घेतला आहे.