Monday 2 June 2014

पत्रकारांचे २५ जून रोजी कशेडी घाट रोको आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लगेच सुरू करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत असून याच मागणीसाठी येत्या २५ जून रोजी कशेडी घाटात रस्तारोको कऱण्याचा निर्णय रविवारी पेण येथे रायगड प्रेस क्लब आणि रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
रायग़ड प्रेस क्लबचा अकरावा वर्धापन दिन काल पेण येथे उत्साहात साजरा केला गेला.यावेळी उत्कृष्ठ कार्यकरणाऱ्या पत्रकारांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान कऱण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख होते तर पेणचे आमदार धैर्यशील पाटील,पेण पंचायत समितीचे सभापती महादेव दिवेकर, आणि नगराध्यक्षा प्रितम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला.कोकणातील पत्रकारांनी सलग चार वर्षे शांततेच्या मार्गानं आंदोलन केल्यानंतर आणि दिल्लीपर्यत पाठपुरावा केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास सुरूवात झाली.पळस्पे ते इंदापूर या ८४ किलो मीटरच्या पहिल्या टप्प्याचं कामही वेगानं सुरू झालं.मात्र इंदापूरच्या पुढील टप्प्याच्या कामाबाबत शासकीय पातळीवर कसलीच हालचाल दिसत नाही.इंदापूरच्या पुढाल टप्प्यातही सातत्यानं अपघात होत असल्यानं या टप्पयाचं कामही त्वरित सुरू होणं आवश्यक असल्याचं मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केलं.त्यासाठी पत्रकारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची आणि शांततेच्या मार्गानं आपल्या भावना सरकारपर्यत पोहचविण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली.याबाबत दिल्लीला जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.आंदोलनाच्या तयारीसाठी १५ जूनरोजी महाड येथे बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे.
raigad press