Friday 30 May 2014

पालिकेतील पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना धमक्या

मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांसाठी "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या नोंदणीकृत युनियनच्या संलग्न असलेला "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" स्थापन केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये दूरध्वनीकरून पदाधिकारी असलेल्या तुमच्या पत्रकाराला  समजावा जनसंपर्क अधिकारी खबाळे पाटील आमच्या सोबत आहे अश्या धमक्या देण्यात येत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार "बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ" हा मुंबई महानगर पालिकेमध्ये गेले कित्तेक वर्षे कार्यरत आहे. या वार्ताहर संघाने फक्त कार्यकारणीवरील पदाधिकाऱ्यांचे भले करण्याचे काम सातत्याने केले आहे. पालिकेमध्ये या वार्ताहर संघाची २०१२ - १४ साठी जनसंपर्क अधिकारी खबाळे पाटील यांच्या म्हण्यानुसार पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. गेल्या दोन वर्षात या वार्ताहर संघाने पालिकेतील एकाही पत्रकाराला विचारात घेतले नाही. पत्रकारांसाठी कोणतेही कार्यक्रम राबवलेले नाही. पत्रकारांना काही सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केलेले नाही. लहान पेपरचे पत्रकार मोठ्या पेपरचे पत्रकार असा भेदभाव निर्माण करण्याचे काम पालिका वार्ताहर संघाने गेल्या काही वर्षामध्ये केल्याने पालिकेमधील पत्रकारांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

याच दरम्यान वार्ताहर संघ काहीही करत नसल्याने येथील काही पत्रकारांनी  "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या नोंदणीकृत युनियनच्या मार्गदर्शनाखाली " मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" या संघटनेची स्थापना केली आहे. या नव्याने स्थापन झालेल्या पत्रकार संघाने मुंबई तरुण भारतच्या पत्रकार पुनम पोळ यांना जनसंपर्क अधिकारी खबाले पाटील यांच्या धमकीमुळे नोकरीवरून काढून टाकण्याच्या कृत्याचा जाहीर निषेध करत पालिकेमध्ये पाठपुरावा केला होता. पुनम पोळ यांच्या मागे खंबीर पणे उभे राहण्याचे काम मुंबई महानगर पालिका पत्रकार संघाने केले होते. पालिकेमधील पत्रकारांना पालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी यूनियन गेले एक वर्षे पाठपुरावा करत असून सध्या याचा पाठपुरावा पत्रकार संघ करत आहे.

यामुळे जुन्या वार्ताहर संघाच्या पदाधिकार्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. नवीन संघटना जोरदार आपले हात पाय पसरत असल्याने आपले आता काही खरे नाही या भीतीने नवीन पत्रकार संघाच्या अध्यक्ष राधिका यादव यांच्या वृत्तपत्राच्या संपादकांना "तिला समजवा आमच्या सोबत खबाळे पाटील आहे. इकडे एक संघटना असताना दुसरी संघटना उघडण्याची गरज नाही" अशी धमकी दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. या फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव महामुणकर असून मी जुन्या संघटनेचा अध्यक्ष असल्याचे दूरध्वनी वरून सांगितले आहे. दूरध्वनीवरून आलेल्या या धमकीमुळे दैनिक "पूर्णविराम"चे संपादक यार मुहम्मद खान यांनी धमकी देणाऱ्याला चांगलेच सुनावले असून आमची पत्रकार जे काही करते ते बरोबर करत असल्याचे सांगितल्याने धमकी देणाऱ्याचा पचका झाला आहे.

दरम्यान दैनिक पूर्णविरामच्या संपादकांना सातत्याने फोन येत असून नवीन पत्रकार संघाच्या अध्यक्ष असलेल्या राधिका यादव यांना आवर घाला असे सांगण्यात येत आहे. एका महिला पत्रकारामुळे घाबरलेल्या वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने धमक्या देण्याचे प्रकार होत असून काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही असा निर्णय राधिका यादव व त्यांच्या टीमने घेतला आहे. पालिकेतील पत्रकारांसाठी चांगले काम करण्यासाठी "जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र" या नोंदणीकृत युनियनच्या संलग्न असलेला "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" सदैव कार्यरत राहणार असून अश्या धमक्यांना आम्ही भिक घालणार नाही असे सांगण्यात आले आहे.