Tuesday 3 June 2014

सत्यकथा' मासिकाचे संपादक राम पटवर्धन कालवश


patwardhan

मौज प्रकाशनाचे संपादक राम पटवर्धन यांचे आज निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. 'मराठी साहित्यातील हेडमास्तर' अशी ख्याती असलेल्या पटवर्धन यांनी 'सत्यकथा' या मासिकाचे साक्षेपी संपादन केले होते. श्री. पु. भागवत यांच्या सोबतीने त्यांनी 'मौजे'मधून अनेक लेखक घडविले.
राम पटवर्धन यांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिले, लिहिते केले. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी 'सत्यकथे'त आणले.

साहित्याच्या विश्वात पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसे लेखन केले नाही. मार्जोरी रॉलिंग्जच्या 'यार्लिग'चा 'पाडस' हा अनुवाद खूप गाजला. त्यांनी 'नाइन फिफ्टी टू फ्रिडम' या पुस्तकाचा 'अखेरचा रामराम' या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक 'योगदीपिका' नावाने मराठी साहित्यात आणले.

मुळात रुईया महाविद्यालयात प्राध्यापक असलेले पटवर्धन यांना श्रीपुंच्या साक्षेपी नजरेने ओळखले. त्यांना सत्यकथेच्या संपादनाबद्दल विचारले. मौजेत काम करायला मिळणार म्हणून पटवर्धनांनी प्राध्यापकी सोडली आणि संपादन सुरू केले. त्यानंतर सत्यकथा आणि पटवर्धन हे समीकरण बनले. मराठी साहित्यविश्वात त्याला सन्मान मिळाला. पुढे नियतकालिकांची चळवळ संपली आणि १९८२ मध्ये सत्यकथा बंद पडले. पण सत्यकथा आणि पटवर्धन हे नाव मराठी साहित्यक्षेत्रात अजरामर झाले.