Friday 27 June 2014

कौटुंबिक वादातून पत्रकाराची हत्या

thakur
‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी (चिकणघर / म्हारळ) निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. 

सकाळी ११च्या सुमारास ठाकूर यांची त्यांच्या कुटुंबीयांशी वादावादी झाली होती. त्यानंतर भांडणाचे पर्यावसान होऊन ठाकूर यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरावर रॉडने मारल्याच्या जखमा आढळल्याचे काही ग्रामस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ठाकूर यांना ज्या वस्तूने मारले त्या वस्तू गायब झाल्या आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जखमी अवस्थेत असलेल्या ठाकूर यांना उपचार न मिळाल्याने ते मृत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे शवविच्छेदन न करताच रात्री ११.३0च्या सुमारास अंत्यसंस्कारही उरकले. 

गुरुवारी ठाकूर यांची बहीण बुलढाण्याहून आल्यानंतर त्यांनी शिवसिंह यांची हत्या झाल्याचा आरोप केला असून, पोलिसांनी भारती किशोरसिंग ठाकूर व पुतण्या गोविंद ठाकूर यांच्या विरुद्ध ३0२, २0१ कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, ठाकूर यांच्या बहिणीने सांगितले की, शिवसिंग सतत फोन करून भावजय व पुतण्या मला मारतील, असे सांगत होता. ही घटना घडल्यानंतर ठाकूर यांचे पार्थिव उघड्यावरच जाळले . ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद झाली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, ठाकूर यांच्या हत्ये संदर्भात त्यांची भावजय भारती व पुतण्या गोविंद यांच्यावर ३0२, २0१ कलमांतर्गत गुन्हा नोंदविला.