Sunday 20 July 2014

बेरक्याची दखल = अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बस पास मिळण्यास सुरुवात

महाराष्ट्र राज्यातील अधिस्वीकृत पत्रकारांना बस पास मिळत नसल्याने कित्तेक पत्रकार नाराज होते. याबाबत बेरक्यावर सतत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने बातम्यांची दखल घेवून बस पास मिळण्यासाठी लागणारी अधिस्वीकृत पत्रकारांची यादी संचालक माहिती व जनसंपर्क यांच्यामागे लागून बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना पाठवायला लावली आहे. युनियनने सदर यादी संचालकांना बेस्ट कडे पाठवायला भाग पाडल्याने आता अधिस्वीकृत पत्रकारांना बस पास मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई विभागातील राज्य अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बेस्ट बसचा पास सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना सुरु करण्यात आली होती. परंतू अधिस्वीकृत पत्रकारांची यादी बेस्ट प्रशासनाकडे पोहोचली नसल्याने बस पास मिळण्यात अडचणी येत होत्या. याबाबत बेरक्याने आवाज उचलल्या नंतर जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने दखल घेवून संचालक माहिती व जनसंपर्क तसेच बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. युनियनच्या पाठपुराव्या नंतर अधिस्वीकृत पत्रकारांची यादी संचालक माहिती व जनसंपर्क यांनी बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. या यादी प्रमाणे बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिस्वीकृत पत्रकारांना बस पास देण्याचे मान्य केले आहे. 

यामुळे आता विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाच्या सभासद असलेल्या लोकांनाच, किवा या वार्ताहर संघाचे पत्र आणणाऱ्या पत्रकारांनाच पास मिळेल अश्या भ्रमामध्ये पत्रकारांना राहण्याची गरज राहणार नाही. बेरक्याच्या बातम्यावर युनियनने भूमिका घेवून ताबडतोब पत्रकारांना बस पास मिळण्यात येणारी अडचण दूर केली आहे. यामुळे युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ आणि मुंबई अध्यक्ष अजेयकुमार जाधव यांचे नक्कीच अभिनंदन करावे लागेल. युनियनच्या पाठपुराव्याने बस पास मिळण्यास आता कोणत्याही अडचणी बाकी राहिलेल्या दिसत नसल्याने आता लवकरच सर्व अधिस्वीकृत पत्रकारांना बस पास मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यानंतरही बस पास मिळण्यास काही अडचणी आल्यास नारायण पांचाळ यांच्याशी 9892120190 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन युनियन द्वारे करण्यात आले आहे.