Tuesday 22 July 2014

आऊटलूकविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी कोणत्याही मांत्रिकाची किंवा प्लँचेटची मदत घेतली नाही, असा दावा पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केला. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संबंधीचं वृत्त देणाऱ्या आऊटलूक या नियतकालिकाविरोधात आपण अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. आशिष खेतान यांच्याशी आपली भेट झाली होती. पण त्या भेटीमध्ये आपण अशी कोणताही माहिती त्यांना दिली नाही, असंही स्पष्टीकरण पोळ यांनी दिलं. त्यामुळे खेतान यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविल्याचंही पोळ यांनी सांगितलं.

‘‘दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी प्लँचेटचा वापर केल्याचा आरोप, हा प्रसिद्धीसाठी करण्यात आला आहे. लेख लिहून मासिकाचा खप वाढविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे बेजबाबदार पत्रकारितेचे उदाहरण आहे. अशा खोट्या लेखामुळे पोळ यांची बदनामी झाली असून त्यांना मानसिक धक्का बसला आहे. खेतान यांच्या लेखामुळे पोळ यांची बदनामी झाली आहे.” अशी नोटीस पोळ यांनी पत्रकार खेतान आणि आऊटलूकला बजाविली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतले आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी आऊटलुक या नियतकालिकेत एक लेख लिहून दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुण्याच्या पोलिस आयुक्तालयातच प्लॅन्चेट झाल्याचा दावा केला होता.  हे सिद्ध करण्याचासाठीचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत असाही दावा त्यांनी केला होता. त्यामुळे गुलाबराव पोळ अडचणीत आले होते. पुणे पोलिसांनीही प्लॅन्चेट झाल्याची तारीख आणि वेळ कळवा, आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं.