Sunday 13 July 2014

पत्रकार वैदिक यांच्या सईद-मुशर्रफ भेटीनं राजकीय क्षेत्रात खळबळ

भारतातले ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड नेता हाफिज सईद याची भेट घेतली असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या भेटीत त्यांना हाफिज सईद याने मोदींबाबत काही माहितीही विचारली असल्याचंही वेद प्रताप वैदिक यांनी सांगितलं.  त्य़ामुळे त्यांच्या या भेटीनं भारताच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. 

मात्र या भेटीमुळे पत्रकार वेद प्रताप वैदिक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वैदिक यांच्या म्हणण्यानुसार मी पत्रकार असून लोकांशी भेटणं हा माझ्या कामाचा भाग आहे. त्यात गैर काही नाही. संवादाशिवाय सौहार्दता कधीही शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ही भेट 2 जुलै रोजी झाली. या भेटीचा पुरावा म्हणून वेद प्रताप वैदिक यांनी हाफिज सईद सोबतचा चर्चा करतानाचा फोटोही प्रसिद्ध केला आहे. या भेटीदरम्यान मोदींबाबत सईदने प्रश्न केला की, आता मोदी तुमच्या देशाचे वजीरेआलम झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियावर संकट उभं राहिलं आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना वैदिक यांनी सांगितलं की, मोदींबाबतची तुमची कल्पना चुकीची आहे. मोदींनी आपल्या पूर्ण प्रचारादरम्यान मुस्लिम विरोधी एकही वक्तव्य केलेलं नाही. यासोबतच वैदिक यांनी माजी लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांच्याशीही भेट झाल्याचं सांगितलं. परवेज मुशर्रफ यांच्याशीही त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. माझी नाळ भारताशी जोडली गेली असल्याचंही मुशर्रफ यांनी वैदिक यांना सांगितलं. वेद प्रताप वैदिक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी नवभारत टाईम्स तसेच पीटीआय या वृत्तसंस्थेचं संपादकपदही भूषवलं आहे. त्य़ामुळे त्यांच्या या सईद-मुशर्रफ भेटीनं भारताच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.