Sunday 24 August 2014

खंडणी मागणारे २ पत्रकार अटकेत

येरवडाः कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांना बदनामीची धमकी देऊन खंडणी घेणाऱ्या एका साप्ताहिकाच्या दोन पत्रकारांना पोलिसांनी अटक केली आहे. बळीराम येडबा ओहोळ (वय ३६) आणि संदीप शिवाजी भंडारी (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


या प्रकरणी धामणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. ओहोळ आणि भंडारी दोघे उपमहानिरीक्षक धामणे यांना फोन, एसएमएस करून तुमच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. वर्तमानपत्रात या तक्रारी छापायच्या नसतील तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करीत होते. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई, तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवाजी आचामे, नवी मुंबईचे तुरुंग अधिकारी मिंड यांच्या विरोधात ही आमच्याकडे तक्रारी आहेत असे ते धामणे यांना सांगत होते. कारागृहातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आमच्याकडे तक्रारींची पत्रे आली आहेत. ते छापायचे नसेल तर काही रक्कम द्यावी लागेल, असेही ते धामणे यांना धमकावत होते. या प्रकाराला कंटाळून धामणे यांनी तक्रार केली. पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी धामणे यांच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. ओहोळ आणि भंडारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धामणे यांच्या कार्यालयात पैसे घेण्यास आले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली.