Tuesday 26 August 2014

सीरियातील अमेरिकन पत्रकाराची सुटका

वॉशिंग्टन - सीरियामधील दहशतवाद्यांनी गेल्या दोन वर्षांपासून बंदी बनविलेल्या एका अमेरिकन पत्रकाराची अखेर सुटका करण्यात आली. पीटर थेओ कर्टीस (वय 45) याला सीरियामधील बंडखोर दहशतवाद्यांची संघटना असलेल्या अल नुस्रा फ्रंटने ऑक्‍टोबर 2012 मध्ये बंदी बनविले होते. अल नुस्रा फ्रंट ही अल कायदाशी संलग्न संघटना आहे. 

कर्टीस याला गोलन टेकड्यांजवळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेस सोपविण्यात आले. गोलन टेकड्यांचा भाग हा सध्या इस्राईलच्या नियंत्रणाखाली आहे. कर्टीस याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कर्टीस याच्या सुटकेसाठी झालेल्या चर्चेमध्ये अमेरिका थेट सहभागी नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र कर्टीस याच्या सुटकेसाठी खासगी स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती अमेरिकेस होती. या सुटकेसाठी खंडणी देण्यात आली आहे अथवा नाही, याची माहिती नसल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

इराकमधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेने जेम्स फॉली या अमेरिकन पत्रकाराचा शिरच्छेद केल्याची घटना ताजी असतानाच कर्टीस याची सुटका झाली आहे. ""एका अत्यंत दु:खद शोकांतिकेच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या कर्टीस याची सुटका झाली आहे, या बातमीने हायसे वाटते आहे,‘‘ अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी व्यक्त केली.