Thursday 7 August 2014

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमिक शृंखला 'चाचा चौधरी'तील चाचा व साबू या व्यक्तिरेखांच्या चित्रांच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे बुधवारी वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गुरगावमधील मेदांता रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. प्राण यांना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासले होते.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे बुधवारी सकाळी गुरगावच्या एका रुग्णालयात निधन झाल्याची माहिती डायमंड कॉमिक्सचे प्रकाशक गुलशन राय यांनी दिली. सकाळी नऊच्या सुमारास येथील मेदांता रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवल्याचे राय यांनी सांगितले. त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्राण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आपल्या व्यंगचित्रांतून अनेकांच्या चेहर्‍यांवर हास्य खुलवणारा बहुमुखी व्यंगचित्रकार देशाने गमावल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. 

पाकिस्तानच्या लाहोरजवळच्या कासूरमध्ये १९३८ साली जन्मलेल्या प्राण यांनी १९६0 पासून वृत्तपत्र मिलापमध्ये 'दाबू' नावाने कॉमिक पट्टीची सुरुवात केली. तर १९६९ साली त्यांनी हिंदीतील लोटपोट पत्रिकेसाठी रेखाटलेल्या चाचा चौधरी आणि साबू व्यंगचित्रांनी देशभर ख्याती मिळवली. देशात कॉमिक्स परंपरा रुजवण्याचे काम १९८१ पासून प्राण यांनीच केल्याचे डायमंड कॉमिक्सचे प्रकाशक राय यांनी सांगितले. 

जवळपास ५ दशके व्यंगचित्रांच्या दुनियेला आपल्या चित्रांच्या रेखाटनात बांधून ठेवणार्‍या प्राण यांच्या नावाचा समावेश १९९५ साली 'लिम्का बुक'मध्ये करण्यात आला, तर २00१ साली भारतीय व्यंगचित्रकार संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन प्राण यांचा सन्मान केला. त्यांनी सर्वसाधारण कलाकृतींसह विनोदी स्वरूपाच्या श्रीमती पिंकी, बिल्लू, रमण आणि चन्नी चाची यांसारखी व्यक्तिचित्रे रेखाटलेल्या व्यंगचित्रांनाही देशातील विविध वृत्तपत्रांनी प्रकाशित केले आहे.