Friday 12 September 2014

' चिंधी चोर ' असा उल्लेख केल्याने पत्रकरांना संपवण्याची सुपारी

pujariR
गँगस्टर रवी पुजारीचा पत्रकारांनी 'चिंधी चोर' असा उल्लेख केल्याने पुजारी भडकल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय. याच कारणामुळे सध्या पुजारीने आपल्या शार्पशूटर्सला मुंबईतील काही पत्रकरांना संपवण्याची सुपारी दिल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वीच पुजारी टोळीच्या काही गुंडांना अटक करण्यात आली असून मुंबईमध्ये एका पत्रकाराची हत्या करण्यासाठी आल्याची कबूली या गुंडांनी दिली.

पुजारी टोळीच्या गुंडांच्या खुलाश्यानंतर मुंबई पोलिसांनी काही पत्रकारांना सुरक्षा दिली आहे. अंडर्वल्डमध्ये 'चिंधी चोर' म्हणजे खूपच खालच्या दर्जाचा असे मानले जाते, यामुळे चिंधी चोर शब्दावरुन अनेकदा तुरुंगांमध्ये रक्त सांडेपर्यंत हाणामा-या झाल्या असल्याची माहिती मारिया यांनी दिली.

काही दिवसापूर्वी चित्रपट निर्माता करीम मोरानी यांच्या जुहूमधील बंगल्याबाहेर पुजारी टोळीच्या गुंडानी गोळीबार केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी 'चिंधी चोर' रवी पुजारीच्या गुंडांनी हल्ला केल्याचं म्हटलं होतं. 'चिंधी चोर' म्हणून हिणवल्याने भडकलेल्या रवी पुजारीने 'चिंधी चोर' लिहीणा-या पत्रकारांना संपवण्याची सुपारी दिली. आधी या धमकीकडे पत्रकारांनी दूर्लक्ष केलं. मात्र, घर तसंच ऑफीसजवळ काही व्यक्ती संशयीत रित्या फिरताना दिसल्याची माहिती संबंधीत पत्रकारांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून त्यांच्याकडून काही पत्रकारांचे फोटोही सापडलेत.

मोरानी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये हात असल्याच्या आरोपाखाली बिट्टू सिंह विरुद्ध रेड अॅलर्ट नोटीस जारी करण्याची मागणी केल्याचं मारिया यांनी दिली. बिट्टूने आधी मुंबईमध्ये राहून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अयशस्वी झाल्यानंतर तो अमेरिका आणि युरोपमध्ये गेला. तिथे त्याने भारतीय कलकारांना घेऊन स्टेज शो करण्यास सुरुवात केली. बिट्टूने मोरानीला अमेरीकेतील एका शोसाठी शाहरुख खानला घेऊन येण्यास सांगितलं. मात्र, मोरानीने नकार दिल्यानंतर बिट्टूने त्याला धमक्या देण्यास सुरवात केली. त्यातूनच त्याने मोरानीच्या घरासमोर गोळीबार घडवून आणल्याचं कळतंय.

मोरानीबरोबरच बिट्टूने शाहरुख खान, बोमन ईराणीबरोबर बॉ़लिवूडमधील इतरांनाही धकमी दिल्याचं कळतंय. त्यामुळेच पोलिसांनी या सर्वांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. सध्या दाऊद आणि छोटा राजन शांत असल्याने रवी पुजारी आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत जणकारांनी व्यक्त केलं आहे. पत्रकारांच्या सुपा-या देऊन बातम्यांमध्ये राहण्याचा पुजारीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

दैनिक महाराष्ट्र टाइम्स मधून साभार 
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/why-don-ravi-pujari-is-angry-explains-mumbai-police/articleshow/42249991.cms?