Sunday 28 September 2014

'पेड न्यूज' शोधण्यासाठी वृत्तवाहिनीचे ६९७ तास रेकॉर्डिंग केले जाणार

इच्छुक उमेदवार अर्ज भरण्याच्या तयारीत असले तरी उपनगर जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयातील मीडिया सेलमधील अधिकारी "पेड न्यूज‘वर बारीक लक्ष ठेवून आहेत. उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने १४ वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी म्हाडा, महावितरण व एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. प्रत्येक वृत्तवाहिनीचे ६९७ तास रेकॉर्डिंग केले जाणार आहे. 

अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटली तरी सर्व वाहिन्यांवरील बातम्यांचे १५ ऑक्‍टोबरपर्यंत रेकॉर्डिंग केले जात असल्याने पेड न्यूज नजरेतून सुटणार नाहीत, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्ह्याच्या प्रशासकीय इमारतीत आठव्या मजल्यावर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मीडिया सेल तयार करण्यात आला आहे. एखाद्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाप्रमाणे जवळपास १४ अधिकारी बातम्यांवर नजर ठेवून आहेत. ते सतत बातम्या पाहत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यात सगळे व्यस्त असल्याने इतक्‍यात पेड न्यूज दाखवल्या जाण्याची शक्‍यता कमी आहे. उमेदवारी अर्जांची छाननी होऊन यादी अंतिम झाल्यावर अशा बातम्या दाखवल्या जातील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. 

सध्या एमएमआरडीए, म्हाडा व महावितरणमधील जनसंपर्क अधिकारी; तसेच इतर कर्मचारी वाहिन्यांवरील बातम्यांवर बारीक नजर ठेवून आहेत. निवडणूक निरीक्षकांना टीव्हीवर काय पाहिले याविषयी माहिती दिली जात आहे. निवडणूक कार्यालयात प्रत्येक वाहिनीच्या बातम्यांचे ६९७ तास रेकॉर्डिंग होईल, अशी सोय करण्यात आली आहे. १५ ऑक्‍टोबरपर्यंत हे रेकॉर्डिंग केले जाणार आहे.

दैनिक "सकाळ" मधून साभार 
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4854947777147643669&SectionId=11&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88&NewsDate=20140927&Provider=-&NewsTitle=%27%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1%20%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%27%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20697%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97