Wednesday 21 January 2015

बदलत्या काळात नीतिमूल्ये पाळण्याची जबाबदारी पत्रकारांवर - गिरीष बापट

वर्तमानपत्रांत छापून येणार्‍या बातम्यांवर समाज आजही डोळे झाकून विश्‍वास ठेवत असतो. वर्तमानपत्रांत जे छापून येते ते खरेच असते, असा जनतेचा विश्‍वास असतो. जनतेचा हाच विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी जो बातमी देतो तो पत्रकारही खराच असला पाहिजे. बदलत्या काळात नीतिमूल्ये पाळण्याची मोठी जबाबदारी पत्रकारांवर आहे. प्रकाश बाळ जोशी हे नव्या पत्रकारांसाठी त्या बाबतीत आदर्श असेच आहेत, अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी प्रकाश जोशी यांचा गौरव केला.

सन्मानाचा समजला जाणारा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा या वर्षीचा पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना गिरीष बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विधान भवनात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. समाज आज बदलत चालला आहे. पत्रकाराची जबाबदारीही वाढली आहे. पत्रकारांवर समाजाचा विश्‍वास असतो. तो सार्थ ठरवण्यासाठी पत्रकारांनी उच्च नीतिमूल्ये पाळून पत्रकारिता करावी, असे मत गिरीष बापट यांनी व्यक्त केले. प्रकाश बाळ जोशी यांनी या वेळी, 'मला मिळालेला सन्मान हा माझ्या घरचाच सन्मान आहे. कारण मंत्रालय आणि विधिमंडळातच मी अनेक वर्षे पत्रकारिता केली,' अशा भावना व्यक्त केल्या. तसेच पत्रकारितेतले अनेक अनुभवही जोशी यांनी या वेळी सांगितले. अजय वैद्य, अनिकेत जोशी, सुरेश कराळे, सदानंद खोपकर, विलास आठवले, निवड समितीचे सदस्य सदानंद शिंदे यांनी या वेळी प्रकाश जोशी यांच्याबाबतचे अनुभव सांगितले. प्रास्तविक अध्यक्ष प्रवीण पुरो यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यवाह मंदार पारकर यांनी केले.