Wednesday 28 January 2015

आर. के. लक्ष्मण यांचे यथोचित स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

पुणे : आर. के. लक्ष्मण हे देशाचे वैभव होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या प्रतिभाशक्तीने त्यांनी रेखाटलेला 'कॉमन मॅन' हा जगाच्या शेवटापर्यंत जिवंत राहील. राज्य सरकारदेखील त्यांच्या कलेची दखल घेऊन ती जतन करता यावी, यासाठी योग्य ते स्मारक निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करताना आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे ही समाजाला कायम मार्गदर्शक असतील. आपल्या व्यंगचित्रांमधून कायम सत्याची कास धरणार्‍या आर. के. यांच्या जाण्याने अतीव दु:ख होत असल्याचे फडणवीस म्हणाले.  

विनोद तावडे (सांस्कृतिक मंत्री) : आर. के. यांच्या जाण्याने 'कॉमन मॅन' पोरका झाला आहे. माणसांमधील भावनांना आपल्या कुंचल्यांच्या फटकार्‍याने कागदावर उमटवणारे आर. के. यांची लोकप्रियता जनमानसात प्रिय होती. आता सामान्य माणसांचा आवाज नाहीसा झाला असून, केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरात आपल्या व्यंगचित्रांचा बोलबाला असणार्‍या आर. के . यांच्या कलाकृतीने ते कायम मार्गदर्शक ठरतील. 

उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख) : कुंचल्याचा अखेरचा सम्राट आपल्यातून हरपला, या जाणिवेने प्रचंड दु:ख होते. बाळासाहेब आणि त्यांचे अनेक वर्षांपासून स्नेहाचे संबंध होते. बाळासाहेब त्यांना भेटण्यासाठी खास मुंबईहून पुण्याला आले होते. आर. के. यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

श्रीनिवास लक्ष्मण (आर. के. लक्ष्मण यांचे पुत्र) : वडिलांविषयीच्या अनेक मोरपंखी आठवणी आहेत. माझे वडील हे एक कौटुंबिक गृहस्थ होते. ते कालबाह्य रूढी, परंपरा, चालीरीती यांच्या कायम विरोधात असायचे. याकरिता त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून बंड पुकारले. 'कॉमन मॅन'ची निर्मितीदेखील त्यातूनच झाली. भारतीय खगोलशास्त्रज्ञ जेव्हा मंगळावर पोहोचले तेव्हा त्यांनी त्या आशयाचे व्यंगचित्र काढून आपल्या 'सर्जनशीलतेची' चुणूक अद्यापही कायम असल्याचे दाखवून दिले. 

मंगेश तेंडुलकर (ज्येष्ठ व्यंगचित्रकार) : अनेक माणसांची वेगवेगळी रूपे व्यंगचित्रांमधून मांडण्याचे कसब आर. के. यांच्या व्यंगचित्रांमध्ये होते. येणार्‍या काळात नवोदितांपुढे व्यंगचित्रांची परंपरा या पद्धतीने सुरू ठेवणे मोठे आव्हान असेल. सर्वसामान्य माणूस हा आर. के.च्या केंद्रस्थानी होता. त्यांची लोकप्रियता केवळ व्यंगचित्रांमधून सिद्ध होत नाही, तर आतापर्यंत त्या चित्रांमधून एकदाही कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही.

व्यंगचित्राची खरी ताकद शिकवली - विखे-पाटील
वयाच्या ९४ व्या वर्षी आर. के. लक्ष्मण यांचे निधन झाले. व्यंगचित्र या प्रकाराची खरी ताकद काय आहे, हे लक्ष्मण यांनी या देशाला शिकवले असे म्हणायला हरकत नाही. निर्विष आणि विचारप्रवर्तक टीका कशी करावी याचा वस्तुपाठच लक्ष्मण यांनी घालून दिला. असहिष्णुतेचे वादळ घोंघावत असताना आज या देशाला आर. के. लक्ष्मण यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाची खरी गरज आहे. या थोर व्यंगचित्रकाराला आणि महान जीवन भाष्यकाराला आदरयुक्त श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

'कॉमन मॅन'चा आधारस्तंभ हरपला - छगन भुजबळ
आर.के. लक्ष्मण यांच्या निधननाने 'कॉमन मॅन'चा आधारस्तंभ हरपला, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. राजकारण, समाजकारण अथवा अर्थकारण अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती कितीही मोठी व वजनदार व प्रतिष्ठित असो आर. के. लक्ष्मण यांनी तिच्यावर व्यंगचित्र काढताना आणि 'कॉमन मॅन'ची दु:खे वेशीवर टांगताना आपल्या कलेशी कधीही तडजोड केली नाही. आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने मी माझ्या एका आवडत्या जगप्रसिद्ध अशा व्यंगचित्रकाराला कायमचा अंतरलो आहे, असेही भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

आर. के. लक्ष्मण यांना बॉलीवूडची श्रद्धांजली
मुंबई : अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनानिमित्त शोक व्यक्त केला असून 'कॉमन मॅन'च्या या जनकाची प्रत्येकाला उणीव भासेल, अशा भावना व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या व्यंगचित्रांद्वारे देशातील समस्यांना नेहमीच वाचा फोडणार्‍या लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले होते. ते ९४ वर्षांचे होते. अमिताभ बच्चन यांनी लक्ष्मण यांना 'अंतरात्म्याचा आवाज' म्हटले आहे. बिग बी यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, 'देशाचा शांत, मात्र अंतरात्म्याचा आवाज असलेल्या आर. के. लक्ष्मण यांचे निधन झाले आहे.. प्रार्थना, शांती...' याचबरोबर त्यांनी एक काटरूनही पोस्ट केले आहे. त्यात 'आम आदमी'च्या डोळ्यात अश्रू आहेत. अभिनेता अनिल कपूर यांनी ट्वीट केले आहे की, 'आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. या महान कलाकाराने माझे स्केच तयार केले होते, याचा मला गर्व आहे. अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, 'आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाबरोबरच भारताने आपले सकाळचे हास्य गमावले आहे.