Sunday 4 January 2015

माध्यमांनी आरोप न करता अभ्यासपूर्ण टीकाकाराची भूमिका बजावावी - पंतप्रधान

कोल्हापूर : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी केवळ आरोप न करता अभ्यासपूर्ण टीकाकाराची भूमिका बजावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे बोलताना केले. ते येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित दैनिक पुढारीच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. 


माध्यमांकडे मोठी ताकद असते. त्यांनी केवळ आरोपच केले तर विंध्वस होऊ शकतो आणि अभ्यासपूर्ण टीका केली तर विकास होऊ शकतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी विकासात्मक पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये प्रचंड प्रमाणावर तफावत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता करणार्‍यांना प्रसंगी जेलमध्ये जावे लागत असे. आजच्या काळातील पत्रकारितेला स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. प्रसारमाध्यमांनी केवळ आरोप करू नयेत. नुसत्या आरोपांनी नुकसान होते; पण टीका जरूर करावी. कारण टीका करण्यासाठी अभ्यास करावा लागतो, सामाजिक बांधिलकीचे भान असावे लागते, परिस्थीतीची जाणीव असावी लागते. टीकेमुळे सुधारणा करायला वेळ मिळतो. टीका ही अभ्यासपूर्ण असते. अशा टीकेमुळे सकारात्मक सुधारणा घडून येतात, असे प्रतिपादनही त्यांनी केले. 

नरेंद्र मोदी यांच्या भाषणात प्रसारमाध्यमे काल आणि आज हे दोन मुद्दे प्रामुख्याने होते. कालच्या पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचे, देशभक्तीचे मुक्त कंठाने कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी आजच्या पत्रकारितेसमोरील आव्हानांची चिकित्सा केली. तिच्या विश्‍वासार्हतेवर भर दिला. आजही या देशातील सर्वसामान्य जनता ऐकीव माहितीवर विश्‍वास ठेवत नाही; मात्र वृत्तपत्रात आलेल्या माहितीवर ती ठामपणाने विश्‍वास ठेवते, हे आजच्या पत्रकारितेचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यांच्यासमोर आज मोठी आव्हाने आहेत. ही आव्हाने सर्मथपणे पेलण्यासाठी प्रसारमाध्यमांनी कौशल्याने प्रयत्न केले पाहिजेत. माध्यमांनी सत्य माहिती दिलीच पाहिजे, पण त्याचबरोबर चांगली माहिती दिली पाहिजे, असे सांगताना त्यांनी 'सच्चे समाचार और अच्छे समाचार' असा शब्दप्रयोग केला.