Thursday 12 February 2015

उर्दू दैनिकाच्या संपादिकेस दिलासा

मुंबई : फ्रान्समधील 'चार्ली हेब्डो' साप्ताहिकात छापण्यात आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राची पुन:प्रसिद्धी करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या उर्दू दैनिकाच्या संपादिकेला उच्च न्यायालयाने आणखी दिलासा दिला आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी संपादिकेस १७ फेब्रुवारीपर्यंत अटक करता येऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

'चार्ली हेब्डो' या साप्ताहिकातील मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्राची ठाण्यातील दैनिकात पुन्हा छपाई करण्यात आली होती. या प्रकरणी दैनिकाच्या संपादिका शिरीन दळवी यांना अटक झाल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दुसर्‍यांदा गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. मुंबई, ठाणे, मालेगाव अशा विविध ठिकाणी गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर त्यांनी संबंधित गुन्हे रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. या वेळी न्यायालयाने दळवी यांना अंतरिम दिलासा देताना त्यांच्यावर १७ फेब्रुवारीपर्यंत दिलासा दिला.