Friday 27 February 2015

ज्येष्ठ पत्रकार इसाक मुजावर यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक व पत्रकार इसाक मुजावर (वय 81) यांचे आज ( २६ फेब्रुवारी २०१५ ) दुपारी नवी मुंबईतील नेरूळ येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुजावर यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई आणि नातवंडे आहेत. 

मुजावर यांना न्यूमोनिया झाल्यामुळे दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते मूळचे कोल्हापूरचे होते. 1950 पासून ते एका चित्रपटविषयक साप्ताहिकात काम करीत होते. र. गो. सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लिखाण सुरू केले. त्यांनी 1955 पासून चित्रपटांबद्दल लेखन सुरू केले. 1958 मध्ये ते साप्ताहिक "रसरंग‘चे कार्यकारी संपादक म्हणून रुजू झाले. 1978 मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी "चित्रानंद‘ नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्या वेळी ते डोंबिवलीत राहत होते. त्यानंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांत लेखन केले. 

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी त्यांची मैत्री होती. त्यांच्या आठवणींवरही त्यांनी बरेच लेखन केले. मराठी चित्रपटांच्या शंभर वर्षांचा आढावा घेणारे "गाथा मराठी सिनेमाची‘ हे पुस्तक त्यांनी लिहिले. "एका सोंगाड्याची बतावणी‘, "चित्रमाऊली‘, "मीनाकुमारी‘, "मुखवटा‘ आदी पुस्तकांतून त्यांनी मराठी चित्रपटांचा इतिहास आजच्या पिढीसमोर ठेवला. हिंदी चित्रपटसृष्टीवरही त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची याविषयी वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना "चित्रभूषण‘ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.