Sunday 8 February 2015

अखेर ‘सामना’ने मागितली नारायण राणे यांची माफी

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चारित्र्यहनन केल्या प्रकरणी दै. ‘सामना’ने शुक्रवारी ( ६ फेब्रुवारी ) त्यांची बिनशर्त माफी मागितली. १० जुलै २००५ ते २६ सप्टेंबर २००६ या कालावधीत राणे यांच्या विरोधात सतत मानहानीकार वृत्त ‘सामना’तून प्रसिद्ध केले जात होते. त्याविरोधात राणे यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. न्यायालयात झालेल्या समझोत्यानुसार ‘सामना’ने अखेर माफीनामा जाहीर केला. 

शिवसेनेच्या तत्कालीन नव्या नेतृत्वाची एकाधिकारशाही आणि मनमानीविरोधात आवाज उठविल्यानंतर नारायण राणे यांना शिवसेना सोडावी लागली होती. त्यानंतर राणे यांच्या विरोधात सतत गरळ ओकणा-या, चारित्र्यहनन करणा-या बातम्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होत होत्या. त्याविरोधात राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. तसेच यापुढे आपल्या विरोधात ‘सामना’तून मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध होणार नाही याबाबत संबंधितांना समज देण्यासाठी याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या दावा क्र. ३३८२/२००६ नारायण राणे विरुद्ध ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, प्रकाशक सुभाष देसाई यांच्याविरोधात खटला चालला. तेव्हा न्यायालयाने राणे यांच्या विरोधात मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करण्यास ‘सामना’ला बंदी घातली होती. या खटल्याच्या समझोता पत्रानुसार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी दै. ‘सामना’मधून नारायण राणे यांची जाहीर माफी मागितली.

१० जुलै २००५ ते २६ सप्टेंबर २००६ या काळात नारायण राणे यांच्या संबंधातील बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात व्यक्तिगत किंवा राजकीय चारित्र्यहनन करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे, अशी सपशेल माफी मागितली आहे.
http://prahaar.in/mahamumbai/290929