Sunday 8 February 2015

पत्रकारांबाबत सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत

मुंबई - पत्रकार पेन्शन योजना,आणि पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे स्वागत केले आहे. 


शासनाच्यावतीने महाराष्ट्रातील पत्रकाराना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.गेले तीन वर्षे पुरस्कारांची नुसतीच घोषणा होत होती.ते दिले जात नव्हते.त्याबाबतचा सतत पाठपुरावा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने केला जात होता. अखेर नव्या सरकारने काल 4 फेब्रुवारी रोजी हे पुरस्कार वितऱण केले.त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. पत्रकार संरक्षण कायद्याबाबत सरकारमध्ये मतमतातरे असली तरी सर्वसंबंधित घटकांशी विचार विनिमय करून यासंदर्भात देखील योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सूतोवाच त्यानी केले.पुढील वर्षी पासून प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक माध्यमांसह ब्लॉग आणि इंटरनेट न्यूजपेपरसाठी पुरस्कार देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार गेली पाच वर्षे आदोलनं करीत आहेत. तसेच पेन्शनसाठीही गेली वीस वर्षे एस.एम.देशमुख प्रय़त्नशील आहेत. 60 वर्षांवरील पत्रकारांना निवृत्ती वेतन सरकारने द्यावे अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मागणी आहे. दहा हजार रूपये पेन्शन दिले गेले तर सरकारी तिजोरीवर जास्तीत जास्त दीड कोटीचा बोजा पडणार आहे. ही बाब समितीच्यावतीने वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.