Monday 16 March 2015

डीडीच्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक शोषणाचा आरोप

नवी दिल्ली, दि. १५ - प्रसारभारतीच्या डीडी वाहिनीत काम करणा-या एका महिलेने वाहिनीच्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या वरिष्ठ अधिका-याविरोधात तक्रार केल्यावर पिडीत महिलेची दुस-या कार्यालयात बदली करण्यात आली असून पोलिसही तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. 

दुरदर्शनमध्ये प्रॉडक्शन असिस्टंट या पदावर काम करणा-या महिला कर्मचा-याने वाहिनीच्या सहाय्यक दिग्दर्शकाविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या वर्षभरापासून संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने हे कृत्य सुरु केल्याचे पिडीत महिलेचे म्हणणे आहे. महिलेने मुझफ्फरनगर दंगलीसंदर्भात एका डॉक्यूमेंटरी तयार केली होती व ही डॉक्यूमेंटरी बघण्याच्या बहाण्याने संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने मला रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवले.रात्री उशीरा कॅबिनमध्ये बोलवून माझ्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्नही केला असा दावा महिलेने केला आहे. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात डीडीच्या सर्व कर्मचा-यांसमोर संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधीत महिला ही स्वतः कार्यालयातील महिला अत्याचार विरोधी समितीच्या सदस्य आहेत. 
पिडीत महिलेने दिल्लीतील टिळक मार्ग पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून पोलिस गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करत आहे असा आरोप महिलेने केला आहे. तर डीडीचे उच्चपदस्थ अधिकारीही माझ्या तक्रारींची दखल घेत नाही. याऊलट डीडीच्या मंडी हाऊस कार्यालयातून माझी बदली सेंट्रल प्रॉ़डक्शन सेंटरमध्ये करण्यात आली असे महिलेने सांगितले. तर महिलेने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप चुकीचे असल्याचे संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. मुझफ्फरनगरवरील डॉक्यूमेंटरी पुरस्कारांसाठी पाठवली नसल्याने महिला नाराज होती असे या दिग्दर्शकाने म्हटले आहे. महिलेने यापूर्वीही डीडीच्या वरिष्ठ अधिका-यांकडे माझ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर माझी चौकशीही झाली पण समितीने या तक्रारीत तथ्य आढळले नव्हते असे या दिग्दर्शकाने स्पष्ट केले.