Monday 16 March 2015

वृत्तपत्राकडे विकासाचे साधन म्हणून पाहिले पाहिजे - राधाकृष्ण नार्वेकर

वसई : स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही देशातील जनतेचे मूलभूत प्रश्न कायम आहेत. पत्रकारांनी वृत्तपत्रे ही बातम्या प्रसिद्धीची साधने न मानता विकासाची साधने मानली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व दै.'पुण्य नगरी'चे सल्लागार संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनी विरार येथे बोलताना केले. 

कै. विजयानंद पाटील स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंपले, विवा महाविद्यालयातील सेमीनार सभागृहात आयोजित 'पत्रकारिता कालची व पत्रकारिता आजची' या विषयावर ते बोलत होते. १९९0च्या दशकात वसईतील त्या वेळचे भाऊसाहेब वर्तक यांचे काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रभाव कमी होत असताना त्या वेळी आपण दै. मुंबई सकाळचे संपादक असताना वसई पश्‍चिम पट्टीत नवे नेतृत्व शोधण्याचा प्रयत्न केला. माझ्या या प्रयत्नाला त्या वेळचे स्थानिक पत्रकार कै. विजयानंद पाटील यांची साथ होती, असे सांगून आपण त्या वेळच्या कला-क्रीडा महोत्सवासारख्या स्थानिक उपक्रमांना तसेच नागरिकरणाच्या विरोधात उभ्या राहणार्‍या चळवळींनाही प्रसिद्धी दिली. वसईत नवे नेतृत्व शोधण्याचा संपादक म्हणून आपला प्रयत्न व त्यासंबंधीची चर्चा वसईतील माजी प्राचार्य कोडोलीकर व प्रा.स.गो वर्टी (समाजवादी नेते) यांच्याशीही केली होती. वृत्तपत्राने आपल्या परीने राजकीय व सामाजिक बदल घडवले पाहिजेत. या दृष्टीने आपण त्या वेळी काम केले, त्याचा या भागाला साहजिकच फायदा झाला. चळवळी आणि महोत्सवालादेखील आपण येथे स्वतंत्र व्यवस्था उभारून चांगली प्रसिद्धी त्या वेळी दिली. पूर्वीच्या पत्रकाराला तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागे. आज संगणक व तत्सम साधने व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ग्रामीण भागात तरीही पत्रकारितेचे स्वरूप आज पूर्वीसारखे राहिलेले नाही. पत्रकारांनी प्रलोभने टाळली पाहिजेत. आजचे पत्रकार चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्यांनी तसे न करता पत्रकारिता गंभीरपणे करावी. चरित्र व चारित्र्य चांगले असणे पत्रकारितेला आवश्यक आहे. पत्रकाराने भरकटू नये तरच या व्यवसायात पत्रकाराला मान मिळेल. अभ्यास, कष्ट, निरीक्षण व चिंतन यातून पत्रकारिता केली पाहिजे. 

काळानुसार वृत्तपत्र व्यवसायात तांत्रिक बदल झाले तरी त्याचा गाभा बदलेला नाही. याचे भान पत्रकाराला असणे आवश्यक आहे. पत्रकाराला आपल्या प्रदेशाची भौगोलिक रचना, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी व सद्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याने त्याचा तौलनिक अभ्यास करावा. त्या संबंधीची माहिती त्याने कष्टपूर्वक मिळवली पाहिजे. ज्याला हे गंभीरपणे करता येईल, कष्ट सोसतील त्याने ती करावी अन्यथा दूर जावे, असे रोखठोक प्रतिपादन त्यांनी केले. यंग स्टार्स ट्रस्टतर्फे या व्याख्यानमालेचे प्रयोजन व त्यामागची भूमिका माजी नगराध्यक्ष मुकेश संखे यांनी स्पष्ट केली. प्रकाश वनमाळी यांनी संचलन, तर संजीव पाटील यांनी आभार मानले.