Thursday 19 March 2015

‘प्रेस क्लब’साठी उल्हासनगरमधील पत्रकारांचा लढा !

उल्हासनगर- महापालिकेच्या मालकीच्या गोल मैदान येथील रोटरी मिडटाऊन सभागृह प्रसिद्धीमाध्यमांना ‘प्रेस क्लब’ म्हणून देण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत झाला आहे, मात्र काही नगरसेवकांनी या ठरावात फेरबदल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने ठरावात फेरबदल झाल्यास प्रेस क्लबला जागा मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. 

उल्हासनगर महापालिकेच्या गोलमैदान उद्यानाचे खासगी संस्थांनी नेतेमंडळींना हाताशी धरून तुकडे पडले आहेत. हे उद्यान ब्रह्मकुमारी संस्था, रोटरी मिडटाऊन क्लबने ताब्यात घेतले आहे. रोटरी मिडटाऊन क्लबच्या ताब्यात उद्यानातील जवळपास १५०० चौरस मीटर जागा आहे. ही वास्तू मागील १० वर्षापासून रोटरी मिडटाऊन क्लबच्या ताब्यात होती. हॉल चढय़ा भावाने भाडय़ावर देणे, बेकायदा खेळणी लावून जादा दराने पैसे आकारणे, गोरगरीबांच्या मुलांना उद्यानात प्रवेश नाकारणे असे अनेक आरोप या संस्थांवर पालिकेच्या महासभेत झाले आहेत. यातून सेवाभावी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोटरी संस्थेचे खरे स्वरूप समोर आले आहे. संस्थेचा पालिकेबरोबर झालेला करार १० ऑक्टोबर २०१३ला संपला आहे, मात्र रोटरी मिडटाऊन क्लबने या परिसरावरील ताबा सोडलेला नाही.
ही वास्तू अन्य संस्थेला देण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या महासभेत विषय आला होता. उल्हासनगर मराठी पत्रकार संघाने ही वास्तू शहरातील प्रसिद्धीमाध्यमांसाठी ‘प्रेस क्लब’ म्हणून वापरण्यासाठी मागितली असल्याचे नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी त्या वेळी सांगून अवघ्या एक रुपयाच्या भाडय़ावर देण्याबाबत ठराव मांडला होता. हा ठराव पारितही झाला होता. पत्रकारांनीही आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन रोटरी मिडटाऊन सभागृह पालिकेने ताब्यात घ्यावे, यासाठी पाठपुरावा केला आहे. पालिकेच्या मालमत्ता विभागाने रोटरी मिडटाऊन क्लबला मालमत्ता रिकामी करण्याची नोटिस बजावली होती. त्यामुळे जाग आलेल्या क्लबच्या सदस्यांनी बडय़ा नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत पत्रकारांसाठी देण्याच्या ठरावात फेरबदल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शुक्रवारच्या महासभेत आणला. हा प्रस्ताव महासभेत पारित झाल्यास शहरातील नागरिकांच्या हिताचे विषय उचलणा-या पत्रकारांचा हक्क हिरावला जाणार आहे. याविरोधात सर्वपक्षीय बडय़ा नेत्यांची भेट घेऊन ठराव कोणत्याही परिस्थितीत पास करू नये, अशी मागणी करणार असल्याचे उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश पवार यांनी सांगितले.