Sunday 8 March 2015

पत्रकार हा समाजाचा खरा मार्गदर्शक

सिंधुनगरी- पत्रकार हा शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहिला पाहिजे. पत्रकारांचे समाजातील अस्तित्व टिकविण्यासाठी, त्यांच्याबद्दल आदराची भावना राहण्यासाठी पत्रकारांनी आपल्या आचारसंहिता पाळल्यास समाजाला खरा मार्गदर्शक म्हणून पत्रकार समाजात चांगले स्थान निर्माण करेल असे प्रतिपादन दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या दोनदिवशीय स्नेहमेळावा व शिबिरात ते बोलत होते. 

पर्यटकांचे आकर्षण असलेले ‘हिल स्टेशन’ आंबोली, निसर्गरम्य अन् थंड हवेच्या ठिकाणामुळे पर्यटकांना या ठिकाणी सातत्याने येण्याचा मोह होतो. याच ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिंधुदुर्गातील पत्रकारांसाठी दोन दिवशीय निवासी स्नेहमेळावा व शिबिर झाले. या शिबिरामध्ये ज्येष्ठ पत्रकारांनी आपले अनुभव व त्यांनी केलेले मार्गदर्शनही शिबिरार्थी पत्रकारांना ग्रीनव्हॅलीच्या सान्निध्यात अनुभवता आले. त्यामुळे हे शिबिर उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट, सतीश पाटणकर, माधव कदम, संतोष वायंगणकर, विजय शेट्टी, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण नाईक, गोवा दूतचे संपादक व गोवा पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर गावकर आदींनी या शिबिरात आपले पत्रकारितेचे अनेक वर्षाचे अनुभव सांगताना पत्रकारांना आवश्यक ठरणारे मार्गदर्शन केले.  या शिबिरात पत्रकारितेच्या मार्गदर्शनाबरोबरच मालवणी फेम दादा मडकईकर यांच्या गझल आणि कवितांनी पहिल्या दिवशीची सायंकाळ उशिरापर्यंत रंगली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, विजय शेट्टी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट, किरण नाईक यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी पत्रकारांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच प्रशासनालाही मोठी मदत मिळाली आहे, अशा भावना व्यक्त केली.
समारोपाच्या कार्यक्रमासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी मार्गदर्शन केले. जि. प. चे अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटय़ा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. जिल्हा पत्रकार संघाचे सचिव पत्रकार गणेश जेठे यांनी सूत्रसंचालन केले.