Thursday 2 April 2015

निर्भीड पत्रकार घडवण्याचे 'चौथा स्तंभ'चे काम स्तुत्य - देसाई

मुंबई : जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना वाचा फोडण्याची महत्त्वाची भूमिका पत्रकारांना बजावावी लागते. त्यासाठी चौथा स्तंभ संस्थेने पुढाकार घेतला असून असे निर्भीड व तडफदार पत्रकार बनवण्याचे हे त्यांचे कार्य स्तुत्य असेच आहे, असे गौरवोद्गार माजी नगरसेवक परशुराम (छोटू) देसाई यांनी काढले. दादर येथील स्नेहलता राणे गर्ल्स हायस्कूल येथे चौथा स्तंभ संस्थेचा दहावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळेस देसाई बोलत होते.

या वेळी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम गवळी, महाराष्ट्र करियर अकादमीचे संचालक स्वप्निल मुंज, स्नेहलता राणे गर्ल्स हायस्कूलचे विश्‍वस्त विष्णू शेलार, जी. आर. पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व चौथा स्तंभचे अध्यक्ष विजयकुमार बांदल, आदी उपस्थित होते. याप्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम राबविणारे पालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र लोखंडे यांचा विशेष सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. गेली दहा वर्षे चौथा स्तंभ संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे यशस्वी धडे देण्यात येऊन त्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ही चळवळ अशीच चालू ठेवून देशाला उत्तम पत्रकार देण्याचे कार्य या संस्थेने करत राहावे, असे देसाई यांनी सांगितले.