Friday 27 March 2015

एका संपादिकेचे सांगणे..

कॅथरीन व्हायनर या ‘द गार्डियन’ या ब्रिटिश इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकपदी निवडल्या गेल्या आहे. हे वृत्तपत्र एका न्यासातर्फे चालविले जाते आणि या न्यासाच्या सदस्यांखेरीज काही महनीय व्यक्ती मिळून ८३९ जण संपादकांची निवड करतात. या ‘निवडणुकी’तील एक उमेदवार म्हणून व्हायनर यांनी केलेले हे भाषण.. जग बदलते आहे, तंत्रज्ञान बदलते आहे आणि पत्रकारितेच्या मूल्यांनाही आव्हाने मिळत आहेत.. त्याबद्दल संपादकपदावरील व्यक्तीचे विचार काय असावेत, याची चर्चा केवळ ‘गार्डियन’पुरती आणि त्या एका वृत्तपत्राभोवती मर्यादित राहू नये, या हेतूने इथे अनुवादित स्वरूपात ! 

‘द गार्डियन’ने डिजिटल क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातून यशस्वी मार्गक्रमणा केली आहे; आपला विस्तार (कामाचा पसारा किंवा खप) मोठा आहे, गार्डियनला स्वत:च्या वेगळेपणाची आणि कोणत्या गोष्टींमुळे हे वेगळेपण आहे याची सखोल जाण आहे. विश्वास दुर्मीळ बनत चालला असताना वाचकांचा आपल्यावर विश्वास आहे. सर्वाना हवीशी वाटावी अशी या वृत्तपत्राच्या मालकीची रचना आहे, जागतिक पातळीवर चांगले नाव आणि एकामागून एक खास बातम्या आणणारे उत्तम पत्रकार आहेत. पण आपल्यापुढे मोठी आव्हानेही आहेत. ‘गार्डियनची पत्रकारिता’ कायम टिकवण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट आणि लवचिक योजना असणे, विनम्र राहूनही आपण अज्ञात भविष्याचा सामना करण्यास कटिबद्ध असणे गरजेचे आहे. यासाठी, वेगळी वाट चोखाळत नव्याने आत्मशोध घेण्याची व धोका पत्करण्याची तयारीही हवी. हे कसे व्हावे, यासाठी हे काही मुद्दे.
१. बातम्या द्या, बातम्या द्या! नव्या बातम्या शोधणे आणि वार्ताकन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अचूकपणा आणि प्रामाणिक पणाच्या (न्यायबुद्धीच्या) पायावर उभे राहून आपण वाचकांना जग समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देत राहू. सत्ताधाऱ्यांना जबाबदार बनवणे, स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि अन्यायाला वाचा फोडणे ही कामे करत राहू. आपल्या बातम्यांची वाचकांसाठी असलेली प्रस्तुतता (सुसंगती) जपता यावी म्हणून बातम्या मिळण्यासाठी, त्या पडताळून पाहण्यासाठी, सांगण्यासाठी आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण नवे डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. तसेच आपल्या वार्ताहरांना, त्यांच्या स्रोतांना संरक्षण दिले पाहिजे.
२. आवश्यक त्या बातम्यांचे अविरतपणे वार्ताकन : महत्त्वाच्या घडामोडींचे आपण व्यापक आणि र्सवकष वार्ताकन केले पाहिजे. त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गरीब-श्रीमंतांमधील (संपत्ती) वाढती दरी, इसिस (सीरियातील दहशतवाद), युरो संकट या विषयांपासून ते स्त्रियांचे आत्मभान ते सिलिकॉन व्हॅलीची प्रकाशझोतात न आलेली बाजू.. या सगळ्यांचे वार्ताकन आपण केले पाहिजे.
३. डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारापत्रकारिता आणि तंत्रज्ञानाचा आता संगम झाला आहे. आजच्या काळाशी सुसंगत असलेली पत्रकारिता करण्यासाठी संपादकीय, तांत्रिक व उत्पादन या विभागांचे चांगले परस्पर सहकार्य असणे गरजेचे आहे. तसेच मोबाइल, माहितीबाबतचा प्रामाणिकपणा आणि वाचकांना आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे याविषयी आपण विचार केला पाहिजे.
४. तरुणांना आपलेसे कराआपल्याला माहीतही नाही अशी उपकरणे किंवा व्यासपीठे वापरणाऱ्या तरुणांपर्यंत आपण विनाविलंब पोहोचले पाहिजे. आपल्याला ते जेथे हवे आहेत तेथे नाही, तर ते जेथे आहेत तेथे जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.
५. चर्चा झडत राहोत.. गार्डियनमधील भाष्य करणारा रकाना हा ताज्या घडामोडींवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी वाचकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. आपले वेगळेपण जपण्यासाठी आपण, मते किंवा भूमिका बनवणे हा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्याइतकीच ज्यांचा आवाज दडपला जात आहे त्यांनादेखील ठळकपणे प्रसिद्धी दिली पाहिजे. आपल्या जगाविषयीच्या दृष्टिकोनासह विविध मते, भूमिका यांना आव्हान देणाऱ्या चर्चा झडतात तेव्हा त्या उपयोगी ठरतात.  
६. नुसते कौतुकास्पद नाही तर प्रेमास लायक बनावाचक बातम्यांसाठी आपले कौतुक करतात. पण दर्जेदार लेख, क्रीडा, कला, फॅशन, खाद्यसंस्कृती, पर्यटन यांविषयीची सदरे, व्हिडीओ, पॉडकास्ट, नियतकालिके आणि पुरवण्या यामुळे आपल्यावर प्रेम करतात. खेळकर बुद्धिमत्ता, विनोदी आवाज आणि वेगळ्या स्वरासाठी लोक आपल्याला ओळखतात. पण कळकळ आणि गंमत यांच्या मिलाफातून आपण आणखी चांगले काम करू शकतो.
७. सुंदर दिसा, अर्थपूर्ण बनाछायाचित्रे, मांडणी तसेच निर्मितीचा दर्जा यांना महत्त्व आहे. व्यवस्थित संपादित केलेल्या बातम्या, प्रभावशाली व्हिडीओ, योग्य निवड केलेली छायाचित्रे, स्पष्टपणे केलेले दिशादर्शन (बातम्या, लेख, सदरे कोठे, कोणत्या पानावर आहेत यासाठी), दृष्टीला भावणाऱ्या पद्धतीने मांडणी केलेल्या बातम्या यांनी गार्डियनचे वाचक उत्साहित होतात. तर अचूकतेने ते आश्वस्त होतात.
८. छापील माध्यमाला जपा, पण त्यामुळे तुम्ही जखडले जाणार नाही याची काळजी घ्या : सोमवार ते शुक्रवारचा अंक, शनिवारचा गार्डियन आणि ऑब्झव्‍‌र्हर यासाठी आपण सुस्पष्ट धोरण ठरवले पाहिजे. छापील माध्यमाच्या भविष्यासंबंधी आपले निर्णय व्यवस्थित सांगितलेल्या, आदर्शवादी नसलेल्या निकषांवर आणि सुस्पष्ट योजनेवर आधारित असावेत. छापील माध्यमामुळे आपले डिजिटल माध्यमांकडे होणारे स्थित्यंतर रखडता कामा नये, मात्र अनुभवी पत्रकारांसह आपण छापील माध्यमाचे जतन केले पाहिजे.
९. खऱ्या अर्थाने जागतिक बनागार्डियनची आंतरराष्ट्रीय वाचकसंख्या मोठी असली आणि अमेरिका व ऑस्ट्रेलियात आपल्या नव्या आवृत्त्या निघत असल्या तरी आपण अद्याप खऱ्या अर्थाने जागतिक वृत्तसमूह झालेलो नाही. जागतिक वाचकांसाठी आपण जे काही करत आहोत त्याची पुनर्रचना केली पाहिजे. जेथे वार्ताकनात विविधता आलेली नाही, जेथे आपले प्रतिनिधी कमी आहेत, भारत आणि नायजेरिया हे देश जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तेथे आपण नवे वार्ताहर नेमले पाहिजेत. आपल्या काळातील बरेचसे महत्त्वाचे विषय, जसे अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, युद्ध, इतकेच नव्हे तर लैंगिक भानगडी, विविध देशांच्या सीमांच्या बंधनापलीकडील आहेत. त्यांची व्याप्ती जागतिक आहे. त्या सर्वाचा परस्परसंबंध जोडून र्सवकष चित्र उभे करणाऱ्या बातमीदारांची गरज आहे.
१०. वाचकांमधील अंतर कमी करानव्या तंत्रज्ञानाचा असाही अर्थ होतो की वाचक आपले अनुभवांचे आदानप्रदान करू शकतात, आपल्याला बातम्या मिळवण्यास आणि निर्णय घेण्यास मदत करू शकतात. त्याचा वापर करून वाचकांचा आपल्या माध्यमातील सहभाग कसा वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे.
११. व्यावसायिकतेसह काम करा : आपली पत्रकारिता विकाऊ असणार नाही, संपादकीय स्वातंत्र्य कायम अबाधित राखले गेले पाहिजे. हे खरेच. पण मोबाइल माध्यम, जिथे महसूल मिळवणे कठीण आहे, त्या विषयीच्या आव्हानांचाही सामना आपण केला पाहिजे.
१२. संतुष्ट आणि विविधांगी कर्मचाऱ्यांची संघबांधणी : वेगवेगळ्या विषयांतील ज्ञान असलेल्या उत्तमोत्तम पत्रकारांना आपण नोकरी दिली पाहिजे. आपल्या पत्रकारांना त्यांची गुणवत्ता, ज्ञान आणि व्यक्तिमत्त्वानुसार काम दिले पाहिजे, त्यांना सर्वोत्तम डिजिटल प्रशिक्षण देऊन विकसित केले पाहिजे. त्यांना त्यांच्या व्यावसायिक विकासाबद्दल सतत संवादाची आणि कामाचा अहवाल सादर करण्याच्या सुस्पष्ट व सोप्या रचनेची गरज (रिपोर्टिग स्ट्रक्चर) आहे. याबाबत सर्व नवीन कल्पनांचे स्वागत आहे. बातमीदारी हा तणावपूर्ण व्यवसाय आहे आणि त्याला आपल्याला सामावून घेतले जात आहे ही उत्साहवर्धक भावना, उद्दिष्ट आणि आनंदाने संतुलित करावे लागते. मला लंडन, सिडनी आणि न्यूयॉर्क येथे कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करवून घेण्याचा आणि त्यासोबत उत्साहवर्धक वातावरण कायम ठेवण्याचा अनुभव आहे.
१३. प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे!  आपल्याला जबरदस्त ओळख आहे, आदरणीय इतिहास आहे, प्रामाणिकपणा आणि लवचिकपणाचा पाया आहे. द गार्डियन काही गोष्टींच्या पाठी उभे राहते; सी. पी. स्कॉट यांच्या शब्दांत सांगायचे तर प्रामाणिकपणा, धाडस, नि:पक्षपातीपणा आणि आपल्या वाचकांप्रती कर्तव्यभावना यासाठी. त्याला खरेच महत्त्व आहे. मी गार्डियनला पुरोगामी आणि मुक्त व्यासपीठ म्हणून विकसित करण्यास कटिबद्ध आहे. वार्ताकनासाठी निवडलेल्या विषयांमधून, टिप्पणी करताना गार्डियनच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या भूमिकांना दिलेला वाव यातून ते प्रतित होते. गार्डियनचे संपादकीय कोणी वरवरचे म्हणून वाचता कामा नये (ते गांभीर्याने घेतले पाहिजे) आणि संपादकीय विचार कायम इतिहासाशी सुसंगती दर्शवणारे असले पाहिजेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण गार्डियन का टिकवू इच्छितो यावर भर दिला पाहिजे - वार्ताकनासाठी, माहिती देण्यासाठी, चर्चेसाठी, करमणुकीसाठी.. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, या साऱ्यांनी युक्त असलेल्या जगण्याची आपली मूल्ये जागतिक पातळीवर परावर्तित करण्यासाठी!
(अनुवाद : सचिन दिवाण)